धरमशाला : गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या मोसमात अपेक्षेप्रमाणे सूर गवसलेला नाही. १० सामन्यांत ५ पराभवांसह चेन्नईची गाडी १० गुणांनिशी पाचव्या स्थानी अडली आहे. त्यामुळे प्ले-ऑफ फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना आता पुढील चार सामन्यांत निकराची झुंज द्यावी लागणार आहे. त्यातच बेभरवशी कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाब किंग्जविरुद्ध त्यांचा सामना रविवारी रंगणार आहे.
तीन दिवसांपूर्वी पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्याच मैदानावर सात विकेट्सनी धूळ चारली. घरच्या मैदानावर रंगलेल्या गेल्या तीनपैकी दोन सामन्यांत चेन्नईला पराभव पत्करावा लागल्याने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईचे प्ले-ऑफ फेरीतील स्थान धोक्यात आले आहे. मात्र पुढील चार सामन्यांत चेन्नईचे नशीब चमकते का, याची उत्सुकता सर्वांना आहे.
फिरकीपटू हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे चेन्नईला पंजाबविरुद्ध ७ बाग १६२ धावाच करता आल्या. चेन्नईची फलंदाजी अद्यापही कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि स्फोटक फलंदाज शिवम दुबे यांच्यावरच अवलंबून आहे. ते अपयशी ठरल्यास, चेन्नईची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली जाते. पंजाबविरुद्ध ऋतुराजने यंदाच्या मोसमातील पाचवे अर्धशतक झळकावले असले तरी त्यांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. अनुभवी अजिंक्य रहाणे चांगली सुरुवात करून देण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. तसेच रवींद्र जडेजा आणि समीर रिझवी फिरकीपटूंविरुद्ध चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
चेन्नईचा संघ आरोग्य आणि खेळाडूंच्या फिटनेसमुळे चिंतेत आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरने अवघे दोन चेंडू टाकल्यावर मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. तसेच मथिशा पाथिराना (दुखापतग्रस्त) आणि तुषार देशपांडे (तापाने आजारी) यांच्या अनुपस्थितीचा फटका चेन्नईला बसत आहे. गेल्या सामन्यात रिचर्ड ग्लीसन याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली, त्यामुळे या सामन्यात मुकेश चौधरीला संधी मिळू शकते.
पंजाब किंग्जने लागोपाठ दोन विजय मिळवून प्ले-ऑफच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे पंजाबचा संघ ८ गुणांसह सातव्या स्थानी पोहोचला आहे. जॉनी बेअरस्टो याने कोलकाताविरुद्ध शतक झळकावले होते. रिली रोसू, शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांच्याकडून पंजाबला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि सॅम करण यांसारखे अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहेत. मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्य असण्याची गरज आहे. धरमशाला स्टेडियमवर २०१० साली चेन्नई आणि पंजाब यांच्यात पहिला सामना झाला होता, त्यावेळी धावांचा पाऊस पडला होता.
चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अरावेल्ली अविनाश, रिचर्ड ग्लीसन.
पंजाब किंग्ज
शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत भाटिया, रायली रॉसो, शशांक सिंग, ख्रिस वोक्स, विश्वनाथ सिंग, आशुतोष शर्मा, तनय थ्यागराजन, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, विद्वत कॅव्हेरप्पा, हर्षल पटेल.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप