चंदिगड : इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाला धडाक्यात प्रारंभ झाला असून शनिवारी चाहत्यांना मनोरंजनाची दुहेरी मेजवानी अनुभवता येईल. त्यातच दुपारी रंगणाऱ्या लढतीकडे प्रामुख्याने क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे. जीवघेण्या अपघातातून सावरलेला ऋषभ पंत तब्बल १५ महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात परतण्यास आतुर असून त्याच्या दिल्ली कॅपिटल्सची शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जशी गाठ पडेल.
२६ वर्षीय पंतचा डिसेंबर २०२२मध्ये अपघात झाला होता. त्यातून सावरण्यासाठी पंतला जवळपास सव्वा वर्षांचा कालावधी लागला. गेल्या हंगामात पंतची अनुपस्थिती दिल्लीला जाणवली व त्यांना गुणतालिकेत चक्क नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. यंदा मात्र डावखुरा पंत यष्टिरक्षण, फलंदाज व नेतृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर छाप पाडण्यास सज्ज आहे. त्याशिवाय जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने पंतला निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी ही उत्तम संधी आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही पंतच्या समावेशामुळे दिल्लीचा संघ बळकट झाला असून यंदा खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
दुसरीकडे पंजाबला गतवर्षी आठव्या स्थानी समाधान मानाने लागले होते. यंदा नवे क्रिकेट संचालक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल. अनेक कौशल्यवान खेळाडू संघात असूनही सातत्याने खेळ करण्यात अपयश आल्याने पंजाबला २०१४नंतर एकदाही बाद फेरी गाठता आलेली नाही. आता धवनच्या नेतृत्वाखाली हा संघ काही कमाल करणार का, याचे उत्तर लवकरच मिळेल.
दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त पंतसह प्रामुख्याने डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीवर असेल. पृथ्वीचा गेला हंगाम फारच अपयशी गेला होता. तर वॉर्नरने टी-२० प्रकारावर लक्ष देण्यासाठी जानेवारीत कसोटीतून निवृत्ती पत्करली. त्याशिवाय मिचेल मार्शसारखा अष्टपैलूही त्यांच्याकडे आहे. पंतने यष्टिरक्षण न केल्यास शाय होप किंवा ट्रिस्टन स्टब्सला ‘विकेटकिपिंग’करावी लागू शकते. गोलंदाजीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव दिल्लीसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. त्याला आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, मुकेश कुमार या वेगवान त्रिकुटाकडून साथ अपेक्षित आहे.
विदेशी खेळाडूंवर पंजाबची भिस्त
धवनच्या संघाची मदार प्रामुख्याने विदेशी खेळाडूंवर आहे. लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, कगिसो रबाडा, सिकंदर रझा असे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याशिवाय प्रतिभावान उपकर्णधार जितेश शर्मा, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षल पटेल या भारतीय खेळाडूंकडूनही त्यांना अपेक्षा आहे. २०१४मध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या पंजाबला गेल्या ९ हंगामात सातत्याने निराशेला सामोरे जावे लागले आहे. तसेच धवन स्वत: भारतीय संघातून बाहेर असल्याने तो कशाप्रकारे पंजाबच्या संघाला हाताळतो, यावर बरेच काही अवलंबून असेल.
मुल्लानपूर आयपीएलमधील ३६वे स्टेडियम
मुल्लानपूर येथील महाराज यदविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे आयपीएलमधील तब्बल ३६वे ठिकाण ठरणार आहे. यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाचे घरचे मैदान म्हणून या स्टेडियमचा वापर करण्यात येईल. येथील सरळ सीमारेषा ८१ मीटर, तर दोन्ही बाजूची सीमारेषा ७४ मीटर अंतरावर आहे. मुश्ताक अली स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सातत्याने १८० ते २००च्या दरम्यान धावा केल्या आहेत. चेंडूला येथे उसळी मिळण्याची शक्यता असून तापमान ३० ते ३५ डिग्रीच्या आसपास असेल.
१६ - १६
दिल्ली-पंजाबमध्ये आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी १६ लढती जिंकल्या आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत भाटिया, रायली रॉसो, शशांक सिंग, ख्रिस वोक्स, विश्वनाथ सिंग, आशुतोष शर्मा, तनय थ्यागराजन, अथर्व तायडे, ऋषी धवन, सॅम करन, सिकंदर रझा, शिवम सिंग, प्रिन्स चौधरी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, विद्वत कॅव्हेरप्पा, हर्षल पटेल.