मुल्लानपूर : तारांकित गोलंदाज जसप्रीत बुमराच्या (२१ धावांत ३ बळी) भेदक माऱ्यानंतर २५ वर्षीय आशुतोष शर्माने २८ चेंडूंत ६१ धावांची झंझावाती खेळी साकारली. मात्र त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. आयपीएलमध्ये गुरुवारी रात्री शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर ९ धावांनी सरशी साधली. याबरोबरच सात सामन्यांतील तिसऱ्या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले. पंजाबचा हा तितक्याच लढतीत पाचवा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवचे (५३ चेंडूंत ७८ धावा) अर्धशतक आणि रोहित शर्मा (३६), तिलक वर्मा (नाबाद ३४) यांच्या योगदानामुळे मुंबईने २० षटकांत ७ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची एकवेळ ४ बाद १४ अशी केविलवाणी अवस्था होती. बुमरा व जेराल्डो कोएट्झेने भेदक मारा करताना सॅम करन (६), प्रभसिमरन सिंग (०), रायली रॉसो (१) व लियाम लिव्हिंगस्टोन (१) यांना माघारी पाठवले. इम्पॅक्ट प्लेयर हरप्रीत सिंग (१३) व जितेश शर्मा (९) यांनाही छाप पाडता आली नाही. त्यामुळे पंजाब ९.२ षटकांत ६ बाद ७७ अशा स्थितीत होता.
तेथून शशांक सिंग व आशुतोष यांची जोडी जमली. शशांकने २५ चेंडूंत ४१ धावा फटकावल्यावर बुमराने त्याला जाळ्यात अडकवले. मात्र आशुतोषने २ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी करताना पहिले अर्धशतक झळकावले. त्याने बुमराला स्वीपवर लगावलेला षटकार तसेच स्वीच हिटवर लगावलेला फटका डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. त्याला हरप्रीत ब्रारने (२१) उत्तम साथ दिल्याने पंजाबला एकवेळ २४ चेंडूंत २८ धावांची आवश्यकता होती.
मात्र कोएट्झेला षटकार लगावण्याच्या प्रयत्नात आशुतोष बाद झाला. पुढील षटकात मग हार्दिक पंड्याने ब्रारलासुद्धा माघारी पाठवले. अखेरच्या षटकात १२ धावांची आवश्यकता असताना मोहम्मद नबी व इशान किशन यांनी मिळून कॅगिसो रबाडाला बाद करून पंजाबचा डाव १९.१ षटकांत १८३ धावांत संपुष्टात आणला. बुमरा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता मुंबईचा संघ २२ एप्रिल रोजी राजस्थानशी दोन हात करेल.
बुमराला स्वीपवर षटकार लगावणे स्वप्नवत!
वेगवान गोलंदाजाला स्वीपवर षटकार लगावणे, हे माझे नेहमीच स्वप्न होते. मात्र विश्वातील आघाडीचा गोलंदाज बुमराविरुद्ध असे करू शकल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, अशी प्रतिक्रिया आशुतोषने दिली. मात्र संघाला विजय मिळवू न देऊ शकल्याची खंत आहे. पुढील वेळेस सामना संपवूनच माघारी परतेन, असेही आशुतोषने सांगितले.
हार्दिकला १२ लाखांचा दंड
पंजाबविरुद्धच्या लढतीत षटकांची गती संथ राखल्यामुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबईने निर्धारित वेळेत २ षटके कमी टाकल्याने पंड्याला ही शिक्षा देण्यात आली. हार्दिकवर प्रथमच अशी वेळ ओढवली. दुसऱ्या वेळेस त्याला २४ लाख भरावे लागतील, तर तिसऱ्यांदा षटकांची गती संथ राखल्यास हार्दिकवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. आतापर्यंत दिल्लीच्या ऋषभ पंतला दोनदा, तर कोलकाताचा श्रेयस अय्यर, राजस्थानचा संजू सॅमसन यांना प्रत्येकी एकदा दंड बसला आहे.