IPL 2024: अंतिम फेरीसाठी आज 'कांटे की टक्कर'; हैदराबाद की राजस्थान...KKR सोबत कोण भिडणार?

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे...
IPL 2024: अंतिम फेरीसाठी आज 'कांटे की टक्कर'; हैदराबाद की राजस्थान...KKR सोबत कोण भिडणार?

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी रंगणाऱ्या क्वालिफायर-२ सामन्यात धोकादायक सनरायजर्स हैदराबादसमोर पुन्हा लय मिळवलेल्या राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे उभय संघांतील या जुगलबंदीत कोणता संघ बाजी मारून अंतिम फेरीतील दुसरा संघ ठरण्याचा मान मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. कोलकाता नाइट रायडर्सने अंतिम फेरी गाठली असून २६ मे रोजी त्यांच्याविरुद्ध कोण उभे ठाकणार, याचे उत्तर शुक्रवारी रात्री मिळेल.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने संपूर्ण स्पर्धेत तुफानी फलंदाजीच्या बळावर विविध संघांना हादरे दिले. साखळी फेरीत १४ पैकी ८ लढती जिंकून १७ गुणांसह त्यांनी दुसरे स्थान पटकावले. २०२०नंतर प्रथमच हैदराबादने बाद फेरीत प्रवेश केला आहे. विदेशी खेळाडूंभोवती भारतीय खेळाडूंची योग्य बांधणी करून या संघाने आतापर्यंत वाटचाल केली आहे. मात्र कोलकाताविरुद्ध त्यांना क्वालिफायर-१ लढतीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता त्या पराभवातून सावरत २०१८नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी हैदराबादचा संघ आतुर असेल.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या राजस्थानने हंगामात १४ पैकी ८ लढती जिंकून १७ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. मात्र राजस्थानला एकवेळ अग्रस्थान काबिज करण्याची संधी होती. ९ पैकीच त्यांनी ८ सामने जिंकून एप्रिल महिन्याच्या अखेरीस अग्रस्थान टिकवले होते. मात्र मे महिन्यात त्यांनी सलग चार सामने गमावले होते. अखेर एलिमिनेटर लढतीत राजस्थानने पुन्हा विजयपथावर परतताना बंगळुरूला नेस्तनाबूत केले. त्यामुळे राजस्थानला कमी लेखणे हैदराबादसाठी धोक्याचे ठरू शकते.

राजस्थान-हैदराबाद यांच्यात या हंगामात झालेल्या साखळी लढतीत हैदराबादने अवघ्या १ धावेने शेवटच्या चेंडूवर सरशी साधली होती. यानंतर राजस्थानची पराभवाची मालिका सुरू झालेली. त्यामुळे आता राजस्थान त्या पराभवाचा वचपा काढून २०२२ नंतर पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

यशस्वी, बोल्टवर राजस्थानची भिस्त

डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कविरुद्ध हैदराबादचा ट्रेव्हिस हेड शून्यावरच बाद झालेला. त्यामुळे राजस्थान त्याच्याविरुद्ध ट्रेंट बोल्टचे अस्त्र वापरेल. राजस्थानला सलामीची चिंता सतावत असून मुंबईकर यशस्वी जैस्वाल, सॅमसन व रियान पराग यांच्यावर राजस्थानची फलंदाजी प्रामुख्याने अवलंबून आहे. परागने राजस्थानसाठी या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच सॅमसनही लयीत आहे. ध्रुव जुरेल व शिम्रॉन हेटमायर यांच्याकडून राजस्थानला फटकेबाजी अपेक्षित आहे. गोलंदाजीत बंगळुरूविरुद्ध चमकलेला रविचंद्रन अश्विन व लेगस्पिनर युझवेंद्र चहलवर ते मधल्या षटकांत अवलंबून आहेत. त्याशिवाय आवेश खान व संदीप शर्मा असे प्रतिभावान गोलंदाज राजस्थानकडे आहेत. त्यामुळे राजस्थानची गोलंदाजी विरुद्ध हैदराबादची फलंदाजी अशीही लढत असेल. यामध्ये कोण सरस ठरेल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

सलामीवीर, वेगवान गोलंदाज हैदराबादची ताकद

ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या डावखुऱ्या सलामीवीरांची जोडी हैदराबादसाठी या हंगामात सातत्याने तुफानी फटकेबाजी करत आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत तब्बल ७२ षटकार लगावले आहेत. मात्र क्वालिफायर-१ लढतीत हे दोघेही पॉवरप्लेमध्येच बाद झाले. तसेच हेड तर सलग दोन सामन्यांत भोपळाही फोडू शकलेला नाही. त्याचाच फटका हैदराबादला बसला. त्यामुळे हेडला पुन्हा कामगिरी उंचवावी लागेल. त्यानंतर हेनरिच क्लासेन, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी असे प्रतिभावान खेळाडू हैदराबादच्या ताफ्यात आहेत. अब्दुल समद व शाहबाज अहमदही अखेरच्या षटकांत हाणामारी करण्यात पटाईत आहेत. गोलंदाजीत कमिन्स, भुवनेश्वर कुमार व टी. नटराजन यांचे वेगवान त्रिकुट हैदराबादची ताकद आहे. विजयकांत वियासकांत व शाहबाज यांच्यावर फिरकीची भिस्त असेल. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून १८० ते २०० धावा केल्या, तर त्यांचे गोलंदाज नक्कीच सामना जिंकवून देऊ शकतात.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

- चेन्नईत सध्या तापमानाचा पारा वाढला असून या लढतीत पावसाची शक्यता मुळीच नाही. त्यामुळे चाहत्यांना पूर्ण सामन्याचा आनंद लुटता येईल.

- चेन्नईत यंदा झालेल्या ७ सामन्यांपैकी ५ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. येथे दवाचा घटक निर्णायक ठरत असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. येथील खेळपट्टी काहीशी धिमी असून येथे सातत्याने २०० धावा झालेल्या पाहायला मिळत नाहीत.

चेपॉकवर प्रथमच आमनेसामने

-उभय संघांत आयपीएलमध्ये झालेल्या १९ सामन्यांपैकी हैदराबादने १०, तर राजस्थानने ९ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज अपेक्षित असून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर उभय संघ आयपीएलच्या इतिहासात प्रथमच आमनेसामने येतील.

-हैदराबादचा संघ चौथ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो. त्यांनी २००९ (त्यावेळचे डेक्कन चार्जर्स), २०१६, २०१८मध्ये अशी कामगिरी केली होती. यांपैकी २००९ व २०१६मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले.

-राजस्थानला तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. २००८मध्ये राजस्थानने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात जेतेपद मिळवले होते. २०२२मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

प्रतिस्पर्धी संघ

-राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिम्रॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोल्हर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुष कोटियन, केशव महाराज.

-सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.

logo
marathi.freepressjournal.in