दिग्गज खेळाडूही यापूर्वी अनेकदा एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळले! रोहित-हार्दिक प्रकरणाबाबत अश्विनचे मत

रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्याने सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मुंबईचा संघ सलग तीन पराभवांसह आयपीएल गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. या प्रकरणावर आता अश्विननेसुद्धा भाष्य केले आहे.
दिग्गज खेळाडूही यापूर्वी अनेकदा एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळले! रोहित-हार्दिक प्रकरणाबाबत अश्विनचे मत

मुंबई : दिग्गज खेळाडू एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळल्याची अनेक उदाहरणे आहेत. पूर्वी याबाबत इतकी चर्चा होत नव्हती. मात्र, आता कर्णधार बदलाला फार वेगळे स्वरूप दिले जाते, असे भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला वाटते.

रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्याने सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मुंबईचा संघ सलग तीन पराभवांसह आयपीएल गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे. या प्रकरणावर आता अश्विननेसुद्धा भाष्य केले आहे. “सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळले. पुढे या दोघांनाही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळावे लागले. हे तिघे पुढे जाऊन अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले. तर हे दिग्गज संघात असताना धोनीने कर्णधारपद भूषवले. धोनीही पुढे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. मग आताच नेतृत्वबदलाची इतकी चर्चा का होते?” असा प्रश्न अश्विनने उपस्थित केला.

“चित्रपटात नायक आणि खलनायक असतात. खेळांमध्ये खरे खेळाडू असतात आणि त्यांच्या भावनाही खऱ्या असतात. त्यामुळे खेळ आणि चित्रपट, याची कधीही तुलना करू नये. तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला किंवा संघाला जरूर पाठिंबा द्या, पण त्यासाठी दुसऱ्या खेळाडूला वाईट बोलण्याची काहीच गरज नाही,” असेही अश्विनने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in