
बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) घरच्या मैदानात म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. येथील दोन्ही लढतींमध्ये पराभव पत्करणाऱ्या बंगळुरूला ही मालिका संपुष्टात आणायची असेल, तर युझवेंद्र चहलसह पंजाब किंग्जच्या फिरकीपटूंचे आव्हान पेलावे लागणार आहे. शुक्रवारी आयपीएलमध्ये बंगळुरू आणि पंजाब यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळेल.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने ६ पैकी ४ सामने जिंकले असून तूर्तास ते गुणतालिकेत ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी अनुक्रमे कोलकाता (ईडन गार्डन्स), चेन्नई (चेपॉक), मुंबई (वानखेडे) व राजस्थान (जयपूर) या संघांना त्यांच्याच मैदानात पराभूत करण्याचा पराक्रम केला. मात्र गुजरात आणि दिल्लीविरुद्ध घरच्या प्रेक्षकांसमोर चिन्नास्वामीत खेळताना बंगळुरूचा संघ पराभूत झाला. तसेच दुसरीकडे पंजाबही ६ सामन्यांत तितक्याच ४ विजयांच्या ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आता आयपीएल मध्यतरांच्या टप्प्यावर असताना दोन्ही संघ वैयक्तिक सातव्या लढतीत पाचवा विजय मिळवण्यासाठी आतुर असतील.
मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने गेल्या लढतीत कोलकाताविरुद्ध चक्क १११ धावांचा यशस्वी बचाव केला. या सामन्यात लेगस्पिनर चहलने ४ बळी मिळवले. आता चिन्नास्वामीवरही फिरकीला पोषक खेळपट्टी अपेक्षित असून यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत गुजरातच्या रशिद खान, साईकिशोर, तर दिल्लीच्या कुलदीप यादव, विपराज निगम यांनी बंगळुरूच्या फलंदाजांना हैराण केले. त्यामुळे चहल व पंजाबचे अन्य फिरकीपटू यातून प्रेरणा घेतील.
चिन्नास्वामीवर नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरला आहे. येथे धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. दवही निर्णायक भूमिका बजावू शकतो. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान १८० ते २०० धावा करणे अपेक्षित आहे. एकूणच सीमारेषेच्या तुलनेत लहान असलेल्या चिन्नास्वामीवर चाहत्यांना चौकार-षटकारांची आतषबाजीसुद्धा पाहायला मिळेल.
विराट, सॉल्ट, पाटीदारवर भिस्त
बंगळुरूच्या फलंदाजीची भिस्त विराट कोहली, पाटीदार आणि फिल सॉल्ट या त्रिकुटावर आहे. मात्र त्यानंतर मधली फळी काहीशी चाचपडत आहे. लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड व कृणाल पंड्या यांना कामगिरी उंचावण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाजीत जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार छाप पाडत आहेत. फिरकी विभागात सूयश शर्माकडून बंगळुरूला बळी अपेक्षित आहेत. मात्र तो अपयशी ठरल्यास त्यांची अवस्था बिकट होऊ शकते. त्यामुळे बंगळुरूचा संघ आणखी एका फिरकीपटूला संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
फलंदाजीची पंजाबला चिंता
पंजाबचा संघ कोलकाताविरुद्धच्या लढतीत १११ धावांत गारद झाला. संघात एकापेक्षा अनेक धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असला, तरी अतिआक्रमकपणा महागात पडू शकतो, हे पंजाबने अनुभवले. त्यामुळे आता चिन्नास्वामीवर बंगळुरूविरुद्ध ते कामगिरी उंचावतील अशी अपेक्षा आहे. कर्णधार श्रेयससह प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग व शशांक सिंग या भारतीय चौकडीवर त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. ग्लेन मॅक्सवेलला मात्र अद्याप एकाही लढतीत छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीत झेव्हियर बार्टलेट व अर्शदीप सिंग वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. फिरकीपटू चहल व मॅक्सवेलची जोडी पंजाबसाठी निर्णायक ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप