रोहितचा मुंबई इंडियन्ससाठी आज अखेरचा सामना? लखनऊविरुद्ध हंगामाचा शेवट गोड करण्याचे ध्येय

माजी कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा शुक्रवारी कदाचित इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma
Published on

मुंबई : माजी कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा शुक्रवारी कदाचित इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्ससाठी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबईची अखेरच्या साखळी लढतीत लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार असून या सामन्यात दोन्ही संघांचा स्पर्धेचा विजयासह शेवट करण्याचा निर्धार असेल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ तूर्तास १३ सामन्यांतील ४ विजयांच्या फक्त ८ गुणांसह गुणतालिकेत तळाच्या म्हणजेच १०व्या स्थानी आहे. हंगामाच्या सुरुवातीला रोहितकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिककडे ते सोपवण्यात आले. हा निर्णय संघाला फळला नाही. तसेच असंख्य चाहत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ३७ वर्षीय रोहित या हंगामानंतर मुंबईला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्येही रोहित याविषयी बोलताना आढळला. तो आयपीएल खेळत राहणार असला तरी मुंबईकडून तो पुढच्या वर्षीही खेळताना दिसणार का, याचे उत्तर लवकरच मिळेल.

दुसरीकडे के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ संघाचेही आव्हान ९९ टक्के संपुष्टात आले आहे. लखनऊचा संघ १२ गुणांसह सातव्या स्थानी असला तरी त्यांचा रनरेट हा मुंबईपेक्षाही खराब आहे. त्यामुळे मुंबईला मोठ्या फरकाने नमवूनही त्यांना जर-तरवर अवलंबून रहावे लागेल.

बुमरा, सूर्यकुमारवर मुंबईची मदार

मुंबईसाठी या हंगामात सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनीच फलंदाजीत त्यादृष्टीने सातत्याने योगदान दिले आहे. त्याशिवाय पर्पल कॅपच्या शर्यतीत २० बळींसह दुसऱ्या स्थानी असलेल्या जसप्रीत बुमरावर चाहत्यांचे पुन्हा एकदा लक्ष असेल. विशेषत: सूर्यकुमार व बुमरा टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संघात असल्याने ते लय कायम राखण्यास उत्सुक असतील. हार्दिकने कर्णधार तसेच अष्टपैलू म्हणून संपूर्ण हंगामात निराशा केली असली तरी शुक्रवारी तो चमक दाखवेल, अशी अपेक्षा आहे. रोहितला स्वत: गेल्या ५ सामन्यांत एकदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे त्याची बॅट तळपावी, अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्याव्यतिरिक्त, पियुष चावला, नुवान थुशारा, अंशूल कंबोज यांच्यावर मुंबईची गोलंदाजी अवलंबून आहे.

राहुलचाही लखनऊसाठी शेवटचा सामना?

राहुलसुद्धा पुढील हंगामात लखनऊकडून न खेळण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत त्याचा हा लखनऊसाठी अखेरचा सामना ठरू शकतो. राहुलने या हंगामात धावा केल्या असल्या तरी त्याच्या स्ट्राइक रेटविषयी नेहमीच चर्चा सुरू असते. मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन व क्विंटन डीकॉक या विदेशी त्रिकुटाचे अपयश लखनऊला यंदा महागात पडले. तसेच गोलंदाजीत मयांक यादव जायबंदी झाल्यावर नवीन उल हक, यश ठाकूर यांना सातत्याने चमक दाखवता आली नाही. १० पैकी ६ सामने जिंकूनही सलग ३ लढती गमावल्यामुळे लखनऊच्या आशा मावळल्या.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in