राजस्थानचा विजयरथ लखनऊ रोखणार? स्टोईनिस फॉर्मात; मयांक परतण्याची शक्यता

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये विजयरथावर स्वार आहे.
राजस्थानचा विजयरथ लखनऊ रोखणार? स्टोईनिस फॉर्मात; मयांक परतण्याची शक्यता

लखनऊ : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये विजयरथावर स्वार आहे. ८ पैकी ७ सामने जिंकून गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र शनिवारी सायंकाळी रंगणाऱ्या सामन्यात राजस्थानची झुंजार वृत्तीच्या लखनऊ सुपर जायंट्सशी गाठ पडणार आहे. त्यामुळे लखनऊ घरच्या मैदानात खेळताना राजस्थानचा विजयरथ रोखणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

राजस्थानने गेल्या लढतीत मुंबईला ९ गडी राखून सहज धूळ चारली. सांघिक कामगिरीच्या बळावर त्यांनी ७ सामने जिंकले असून फक्त गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात त्यांना एकमेव हार पत्करावी लागली होती. त्यानंतर गेल्या तीन सामन्यांपासून राजस्थानचा संघ अपराजित आहे. दुसरीकडे के. एल. राहुलच्या लखनऊने सलग दोन सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जला नमवण्याचा पराक्रम केला. ८ सामन्यांतील ५ विजयांसह लखनऊचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून त्यांना बाद फेरी गाठण्याची उत्तम संधी आहे. इकाना स्टेडियमवर १८० ते २०० धावाही विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. येथे दवाचा घटक फारसा प्रभाव पाडत नाही.

यशस्वी, बटलरपासून धोका

मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी जोस बटलर या राजस्थानच्या सलामी जोडीपासून लखनऊला सावध राहावे लागेल. दोघांनीही या हंगामात शतके झळकावली आहेत. त्याशिवाय मधल्या फळीत सॅमसन, रियान पराग उत्तम योगदान देत आहेत. ध्रुव जुरेल व शिम्रॉन हेटमायर यांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत आहे. मात्र त्याचा अद्याप संघाला इतका फटका बसलेला नाही. गोलंदाजी विभाग राजस्थानची ताकद आहे. ट्रेंट बोल्टसारखा डावखुरा वेगवान गोलंदाज व युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन असे फिरकीपटू त्यांच्याकडे आहेत. तसेच आवेश खान व संदीप शर्माही प्रभावी मारा करत आहे.

स्टोईनिस फॉर्मात; मयांक परतण्याची शक्यता

चेन्नईविरुद्ध शतकी खेळी साकारणारा मार्कस स्टोईनिस, क्विंटन डीकॉक, राहुल, निकोलस पूरन या चौकडीवर लखनऊची फलंदाजी अवलंबून आहे. कृणाल पंड्या व दीपक हुडासुद्धा योगदान देत आहेत. मात्र वेगवान गोलंदाज मयांक यादव या लढतीसाठी संघात परतला, तर खऱ्या अर्थाने लखनऊचा संघ आणखी बळकट होईल. मयांकला स्नायूंच्या दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले. यश ठाकूर, मॅट हेन्री व मयांकचे वेगवान त्रिकुट तसेच रवी बिश्नोईची फिरकी गोलंदाजी लखनऊसाठी मोलाची ठरेल. टी-२० विश्वचषकासाठी लवकरच संघ जाहीर होणार असल्याने राहुल व बिश्नोईच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in