हैदराबाद-राजस्थानमध्ये आज हल्लाबोल; राजीव गांधी स्टेडियमवर रंगणाऱ्या लढतीत चौकार-षटकारांची उधळण अपेक्षित

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता बाद फेरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता बाद फेरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या स्पर्धेत गुरुवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर धोकादायक सनरायजर्स हैदराबादची अग्रस्थानावरील राजस्थान रॉयल्सशी गाठ पडणार आहे. हैदराबादचा संघ पराभवाची हॅटट्रिक टाळून विजयपथावर परतण्याच्या निर्धाराने या लढतीत मैदानात उतरेल. तसेच उभय संघांत सर्वाधिक चौकार-षटकारांसाठी जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळू शकते.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने ९ पैकी ५ सामने जिंकले असून ते १० गुणांसह तूर्तास गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. मात्र गेल्या दोन सामन्यांत हैदराबादला बंगळुरू आणि चेन्नईकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या दोन्ही लढतींमध्ये त्यांना धावांचा पाठलाग करता आला नाही. त्यामुळे आता घरच्या मैदानात खेळताना हैदराबादचा संघ पुन्हा एकदा विजयाची लय मिळवण्यास आतुर असेल.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या राजस्थानने ९ पैकी ८ सामने जिंकून बाद फेरीतील प्रवेश जवळपास पक्का केला आहे. १६ गुणांसह राजस्थानचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. हैदराबाद-राजस्थान यंदाच्या हंगामात प्रथमच आमनेसामने येत आहेत. त्याशिवाय हैदराबादच्या खेळपट्टीवर या हंगामातील तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोन वेळा २००हून अधिक धावसंख्या उभारली आहे. दोन्ही संघांत धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असल्याने चाहत्यांना रंगतदार लढत अपेक्षित आहे. येथे दवाचा घटक फारसा प्रभाव पडणार नाही.

हेड, क्लासेनला रोखण्याचे आव्हान

हैदराबादची फलंदाजी प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड आणि आफ्रिकेचा हेनरिच क्लासेन यांच्यावर अ‌वलंबून आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत हे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने हैदराबादलाही फटका बसला. तसेच अभिषेक शर्मा, एडीन मार्करम, अब्दुल समद यांच्याकडून फटकेबाजी अपेक्षित आहे. हैदराबादने या हंगामात ३ वेळा २५० धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना रोखणेच राजस्थानसाठी सर्वाधिक आव्हानात्मक असेल. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन व कर्णधार कमिन्स असे वेगवान त्रिकुट त्यांच्या ताफ्यात आहेत. नीतीश रेड्डीनेसुद्धा हैदराबादसाठी चमक दाखवली आहे. फिरकीपटू शाहबाज अहमद व मयांक मार्कंडे मधल्या फळीत धावा रोखण्याची जबाबदारी वाहतील. शाहबाजने फलंदाजीतही सातत्याने छाप पाडली आहे.

यशस्वी, बटलरवर राजस्थानची मदार

डावखुरा मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी जोस बटलर या सलामी जोडीवर राजस्थानची भिस्त आहे. ही जोडी अपयशी गेली तरी कर्णधार सॅमसन, रियान पराग व ध्रुव जुरेल हेसुद्धा उत्तम लयीत आहे. सॅमसनची टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेली असल्याने तो कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल. तसेच जुरेलने गेल्याच लढतीत अर्धशतक झळकावून लय मिळवली आहे. शिम्रॉन हेटमायर व रोवमन पॉवेल ही वेस्ट इंडिजची जोडी अखेरच्या षटकांत हाणामारी करू शकते. गोलंदाजी राजस्थानची मुख्य ताकद असून याचे श्रेय वेगवान ट्रेंट बोल्ट व लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांना जाते. चहलचीसुद्धा विश्वचषकात निवड झालेली आहे. दुसरीकडे रविचंद्रन अश्विनला मात्र कामगिरीत सुधारणा करावी लागेल. आवेश खान व संदीप शर्मा प्रभावी मारा करत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करणे इतके सोपे नसेल.

प्रतिस्पर्धी संघ

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिम्रॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोल्हर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुष कोटियन, केशव महाराज.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.

logo
marathi.freepressjournal.in