बेधडक 'हेड' ठरणार डोकेदुखी? बंगळुरूची आज धोकादायक हैदराबादशी गाठ; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य

हैदराबादने या हंगामात ३ वेळा २५०हून अधिक धावसंख्या उभारली आहे. त्यातच बंगळुरूविरुद्ध दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सामन्यात हेडच्या घणाघाती शतकाच्या बळावरच हैदराबादने २८७ अशी आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली.
बेधडक 'हेड' ठरणार डोकेदुखी? बंगळुरूची आज धोकादायक हैदराबादशी गाठ; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजय अनिवार्य

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज ट्रेव्हिस हेड यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) तुफानी फॉर्मात आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादचा संघही यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. हाच हेड गुरुवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येणार असून येथे चौकार-षटकारांची उधळण अपेक्षित आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने आतापर्यंत सातपैकी पाच लढती जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान टिकवले आहे. हैदराबादने या हंगामात ३ वेळा २५०हून अधिक धावसंख्या उभारली आहे. त्यातच बंगळुरूविरुद्ध दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सामन्यात हेडच्या घणाघाती शतकाच्या बळावरच हैदराबादने २८७ अशी आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली. हेडने या हंगामात ६ सामन्यांतच १ शतक व २ अर्धशतकांसह ३२४ धावा फटकावल्या आहेत. आता हैदराबादमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना हेड आणखी काही हंगामा करणार का, याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे तारांकित फलंदाजांचा समावेश असूनही बंगळुरूला या हंगामात अद्याप छाप पाडता आलेली नाही. ८ पैकी फक्त एक लढत जिंकल्याने बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १०व्या स्थानी आहे. त्यामुळे फॅफ डूप्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला बाद फेरी गाठण्याच्या किमान काहीशा आशा कायम राखायच्या असतील, तर उर्वरित सर्व लढती जिंकणे अनिवार्य आहे. त्याशिवाय विराट कोहलीच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल. बुधवारी सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, तेथेच हैदराबादने मुंबईविरुद्ध २७७ धावा केल्या होत्या.

विराट आणि गोलंदाजांवर लक्ष

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या विराटकडून बंगळुरूच्या चाहत्यांना मोठी खेळी अपेक्षित आहे. त्याशिवाय डू प्लेसिस, विल जॅक्स, रजत पाटिदार यांनीही विराटला साथ देणे गरजेचे आहे. ग्लेन मॅक्सवेल या लढतीसाठीही अनुपलब्ध असल्याने कॅमेरून ग्रीनला पुन्हा संधी मिळू शकते. गोलंदाजी मात्र बंगळुरूसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या काही सामन्यांपासून बंगळुरूने गोलंदाजीच्या विभागात सातत्याने बदल केला आहे. मोहम्मद सिराज, रिस टॉप्ली, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन यांच्याकडून बंगळुरूला गोलंदाजीत चांगली कामगिरी अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडे चांगला फिरकीपटू नाही. हीच बाब बंगळुरूचा सर्वाधिक सतावत आहे.

अभिषेक, क्लासेन यांनाही रोखण्याचे आव्हान

बंगळुरूला फक्त हेडला बाद करून चालणारे नाही. हेडचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्मा, आफ्रिकेचा धोकादायक हेनरिच क्लासेन यांनाही रोखण्याचे आव्हान बंगळुरूपुढे असेल. त्याशिवाय मधल्या फळीत एडीन मार्करम, नितीश रेड्डी, अब्दुल समद आणि शाहबाज अहमद यांनीही सातत्याने योगदान दिले आहे. त्यामुळेच हैदराबादचा संघ फलंदाजीत अन्य सर्व संघांच्या तुलनेत वरचढ ठरत आहे. गोलंदाजीत कमिन्स, भुवनेश्वर कुमार व टी. नटराजन या वेगवान त्रिकुटावर हैदराबादची मदार आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी २ वेळा २५०च्या आसपास धावा लुटल्या आहेत. त्यामुळे त्यांना या विभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे. फिरकीपटू मयांक मार्कंडे त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.

१० - १३

उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या २४ सामन्यांपैकी बंगळुरूने १०, तर हैदराबादने १३ लढती जिंकल्या आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. आकडेवारीनुसार हैदराबादचे पारडे जड आहे.

प्रतिस्पर्धी संघ

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटिदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, करन शर्मा, मनोज भडांगे, मयांक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा, रंजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग, सौरव चौहान.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.

logo
marathi.freepressjournal.in