
चेन्नई : मुंबई इंडियन्सचा संघ रविवारी चेपॉकच्या खेळपट्टीवर फिरकी ताकदीसह मैदानात उतरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील मोहिमेला सुरुवात करणार आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत चेन्नईविरुद्ध दोन हात करण्याचे आव्हान मुंबईच्या संघासमोर आहे.
महेंद्रसिंह धोनीवर पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष असेल. कारण आयपीएलमध्ये २००८ पासून तो चेन्नईशी जोडलेला आहे.
दुसरीकडे भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा नसल्याचा फटका मुंबईला बसू शकतो. दुखापतीमुळे बुमरा यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या काही लढतीला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला त्याचा पर्यायी गोलंदाज शोधावा लागणार आहे. बुमराच्या अनुपस्थितीमुळे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी कोण करणार? हे मुंबईसमोर आव्हान असेल.
आयपीएलच्या गेल्या हंगामातील अखेरच्या लढतीत स्लो ओव्हर रेटमुळे संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्याला एका सामन्यात बॅन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत तो संघाबाहेर असेल. मुंबईला नेतृत्वाची चिंता नाही. भारतीय संघाचा टी-२० फॉरमॅटमधील कर्णधार सूर्यकुमार यादव सलामीच्या लढतीत मुंबईचे कर्णधारपद भूषवणार आहे.
रचिन रवींद्र, देवॉन कॉनवे या दोन न्यूझीलंडच्या फलंदाजांसह कर्णधार ऋतुराज गायकवाड अशी तगडी टॉप ऑर्डर चेन्नईकडे आहे. ऋतुराजसोबत किवींचा एक फलंदाज सलामीला फलंदाजीला येऊ शकतो. मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, हुडा आणि विजय शंकर यांना संधी मिळू शकते. त्यानंतर धोनी आणि जडेजा फलंदाजीला येऊ शकतात.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज रियान रिकल्टन हा मुंबईकडून रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजीला येऊ शकतो. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि रिसी टॉपली हे वेगवान गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात आहेत. कॉर्बिन बॉसलाही संघात स्थान मिळू शकते. दरम्यान मुंबईच्या संघांची निवड करताना कसा विचार केला जातो यावरही संघ निवड अवलंबून असेल.
फिरकीचे पंचक
पाच वेळा विजेतेपद पटकावलेल्या सीएसकेने आयपीएलच्या मेगा लिलावात आपल्या फिरकी ताकदीला मजबूत केले आहे. संघात अनुभवी रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, श्रेयस गोपाल आणि दीपक हुडा या फिरकी चौकडीसह भारतीय दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या एम. चिदंबरम स्टेडियमवर गेम प्लान हा किती महत्त्वाचा असतो हे गेल्या हंगामात सीएसकेने दाखवून दिले आहे. तगड्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीच्या लढतीत ही रणनीती चेन्नईसाठी फायदेशीर ठरू शकते.
आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत एकूण ३७ सामने खेळले गेले आहेत. त्यातील २० सामने मुंबईने खिशात घातले असून चेन्नईला १७ सामन्यांत विजय मिळवता आला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, गुर्जापनीत सिंग, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकेलटन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथुर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप