CSK चा अजून एक लाजिरवाणा पराभव; RR चा शेवट मात्र गोड

आकाश मढवाल (२९ धावांत ३ बळी) आणि युधवीर सिंग (४७ धावांत ३ बळी) या मध्यमगती गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतरही चेन्नई सुपर किंग्जला मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० षटकांत ८ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारता आली.
CSK चा अजून एक लाजिरवाणा पराभव; RR चा शेवट मात्र गोड
Published on

नवी दिल्ली : आकाश मढवाल (२९ धावांत ३ बळी) आणि युधवीर सिंग (४७ धावांत ३ बळी) या मध्यमगती गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतरही चेन्नई सुपर किंग्जला मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० षटकांत ८ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. मग राजस्थानने हे लक्ष्य १७.१ षटकांत गाठून चेन्नईवर ६ गडी राखून मात केली. यंदाच्या आयपीएलमधील सीएसकेचा हा एकूण १० वा पराभव ठरला.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. युधवीरने दुसऱ्याच षटकात डेवॉन कॉन्वे (१०) व उर्विल पटेल (०) यांचा अडसर दूर केला. त्यानंतर मुंबईचा १७ वर्षीय आयुष म्हात्रे आणि चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रविचंद्रन अश्विनने फटकेबाजी कायम राखताना तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचली.

मात्र सहाव्या षटकात तुषार देशपांडेने आयुषला (२० चेंडूंत ४३ धावा) बाद केले आणि तेथून पुन्हा एकदा चेन्नईची घसरगुंडी उडाली. पुढच्याच षटकात वानिंदू हसरंगाने अश्विनला (१३) व युधवीरने रवींद्र जडेजाला (१) जाळ्यात अडकवले. ५ बाद ७८ धावांवरून मग डेवाल्ड ब्रेविस व शिवम दुबे यांनी डोलारा सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भर घातली. मात्र मढवालने १४व्या षटकात बेव्रिसचा (४२), तर २०व्या षटकात दुबे (३९) व महेंद्रसिंह धोनीचा (१६) बळी मिळवला. ब्रेविस बाद झाला तेव्हा चेन्नई १४ षटकांत ६ बाद १३७ अशा स्थितीत होती, मात्र सहा षटकांत त्यांना फटकेबाजी करता आली नाही.

१८८ धावांचे विजयी लक्ष्य घेऊ मैदानात उतरलेल्या राजस्थानसाठी रियान पराग (४ चेडू ३ धावा) वगळता आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (१९ चेंडू ३६), वैभव सूर्यवंशी (३३ चेंडू ५७) संजू सॅमसन (३१ चेंडू ४१) ध्रूव ज्युरेल (१२ चेंडू ३१) आणि हेटमायर (५ चेंडू १२) यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने लक्ष्य १७.१ षटकांतच गाठले आणि चेन्नईवर ६ गडी राखून मात केली.

logo
marathi.freepressjournal.in