
चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जसमोर कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. दोन्ही संघ या लढतीद्वारे विजयपथावर परतण्याचा प्रयत्न करतील. चेपॉक स्टेडियमवरील या सामन्यात चाहत्यांना फिरकीपटूंचे द्वंद्व पाहायला मिळेल.
ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत आता महेंद्रसिंह धोनी चेन्नईचे नेतृत्व करणार आहे. मात्र सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. तसेच चेपॉकवर त्यांनी ३ पैकी २ सामने गमावले आहेत. सलग चार पराभवांना चेन्नईला आतापर्यंत सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत ते पाचवा पराभव टाळण्यासाठी अथक परिश्रम घेतील. मात्र त्यांना सांघिक कामगिरी उंचावण्याची गरज आहे. रविचंद्रन अश्विन, नूर अहमद व रवींद्र जडेजा या फिरकी त्रिकुटावर चेन्नईची भिस्त असेल. तसेच खलिल अहमद त्यांच्यासाठी सातत्याने छाप पाडत आहे.
फलंदाजीत ऋतुराजच्या अनुपस्थितीत तिसऱ्या स्थानी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, शिवम दुबे व जडेजा या डावखुऱ्या चार फलंदाजांवर चेन्नईची फलंदाजीत मदार आहे. तसेच धोनीच्या फलंदाजी क्रमाविषयी उत्सुकता असेल.
दुसरीकडे मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने ५ पैकी २ सामने जिंकले आहेत. गेल्या लढतीत कोलकाताला लखनऊकडून पराभव पत्करावा लागला. आता ते चेपॉकवर चेन्नईला नमवण्यास आतुर असतील. वरुण चक्रवर्ती व सुनील नरिन असे फिरकीपटू कोलकाताच्या ताफ्यात आहेत. मात्र तरीही त्यांचे गोलंदाज २००हून अधिक धावा लुटत आहेत.
फलंदाजीत रहाणे, वेंकटेश अय्यर व आंद्रे रसेल यांच्यावर कोलकाताची भिस्त आहे. त्याशिवाय रिंकू सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, रमणदीप सिंग यांना कामगिरी उंचावण्याची गरज आहे. अन्यथा कोलकाताला आणखी एक पराभव पत्करावा लागू शकतो.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप