IPL 2025 : चेपॉकवर चेन्नईच्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी; कोलकाताचे ८ गडी राखून सहज वर्चस्व; फिरकीपटूंना विजयाचे श्रेय

आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी अक्षरश: हाराकिरी पत्करली. कोलकाता नाइट रायडर्सच्या फिरकीपटूंनी चेन्नईच्या फलंदाजांची कोंडी करून त्यांना २० षटकांत ९ बाद १०३ धावांत रोखले.
IPL 2025 : चेपॉकवर चेन्नईच्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी; कोलकाताचे ८ गडी राखून सहज वर्चस्व; फिरकीपटूंना विजयाचे श्रेय
Published on

चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी अक्षरश: हाराकिरी पत्करली. कोलकाता नाइट रायडर्सच्या फिरकीपटूंनी चेन्नईच्या फलंदाजांची कोंडी करून त्यांना २० षटकांत ९ बाद १०३ धावांत रोखले. कोलकाताने हे लक्ष्य १०.१ षटकांत गाठून सहज विजय नोंदवला. ३ बळी घेण्यासह १८ चेंडूंत ४४ धावा फटकावणारा सुनील नरिन कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना होता. मात्र त्यातही फलंदाज अपयशी ठरले. १०४ धावांचे लक्ष्य गाठताना कोलकातासाठी नरिनसह क्विंटन डीकॉक (२३), अजिंक्य रहाणे (नाबाद २०), रिंकू सिंग (नाबाद १५) यांनी उपयुक्त योगदान दिले. कोलकाताचा हा तिसरा विजय ठरला, तर चेन्नईला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

तत्पूर्वी, कोलकाताचा कर्णधार रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या षटकापासूनच कोलकाताच्या गोलंदाजांनी हा निर्णय यशस्वी ठरवला. मोईन अलीने डेवॉन कान्वेचा (१२) अडसर दूर केला. त्यानंतर हर्षित राणाने रचिन रवींद्रला (४) बाद केले. पॉवरप्लेमध्ये चेन्नईने २ बाद फक्त ३१ धावा केल्या.

त्यानंतर सुनील नरिन व वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंनी चेन्नईला आणखी अडचणीत टाकले. नरिनने राहुल त्रिपाठी (१६), रवींद्र जडेजा (०) यांचे बळी मिळवले, तर वरुणने विजय शंकर (२९) व इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या दीपक हुडाला (०) बाद केले. नरिननेच मग धोनीलाही (१) पायचीत पकडले. या निर्णयावरून वाद सुरू आहेत.

९ बाद ७९ अशा स्थितीतून मुंबईकर शिवम दुबेने २९ चेंडूंत नाबाद ३१ धावांची झुंज दिली. त्याने अखेरच्या विकेटसाठी अंशुल कंबोजसह (नाबाद ३) २४ धावांची भर घातली. त्यामुळे चेन्नईने किमान शतकी धावसंख्या नोंदवली. कोलकातासाठी नरिनने ३, तर वरुण, हर्षित यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. तसेच मोईन व वैभव अरोराने प्रत्येकी एक बळी मिळवला.

चेन्नईची ही आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी मुंबईविरुद्ध ते दोनदा १००च्या आत ऑलआऊट झाले आहेत. एकंदरच चेन्नईचा संघ यंदा पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. फलंदाजांची निवड आणि क्रम त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे उर्वरित ८ सामन्यांत चेन्नई किती विजय मिळवणार, हे सांगणे कठीण आहे. शनिवारी आता चाहत्यांना दोन सामन्यांचा आनंद लुटता येईल. पंजाब-हैदराबाद, लखनऊ-गुजरात शनिवारी खेळतील.

logo
marathi.freepressjournal.in