
लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जसमोर लखनऊ सुपर जायंट्सचे कडवे आव्हान असेल. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईने सलग पाच पराभव पत्करले असून विजयाची हॅटट्रिक साकारणाऱ्या लखनऊविरुद्ध त्यांच्याच भूमीत चेन्नई कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर ही लढत होईल.
पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवणारा चेन्नईचा संघ तूर्तास गुणतालिकेत तळाशी १०व्या स्थानी आहे. मुंबईविरुद्ध पहिली लढत जिंकल्यानंतर चेन्नईला बंगळुरू, राजस्थान, दिल्ली, पंजाब व कोलकाताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता ६ पैकी फक्त १ सामना जिंकणाऱ्या चेन्नईला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी पुढील प्रत्येक लढत महत्त्वाची असेल. ऋतुराज गायकवाड स्पर्धेबाहेर गेल्याने धोनीकडे पुन्हा संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
या संघाला फलंदाजीची मुख्य चिंता सतावत आहे. डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करण्यात अपयशी ठरत आहेत. मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, विजय शंकर व शिवम दुबे यांनाही छाप पाडता आलेली नाही. धोनीच्या फलंदाजी क्रमाविषयी उत्सुकता असतेच. गोलंदाजीत खलील अहमद व फिरकीपटू नूर अहमद मात्र चेन्नईसाठी सातत्याने छाप पाडत आहेत.
दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊने सहापैकी चार सामने जिंकले आहेत. गेल्या तीन लढतींमध्ये त्यांनी मुंबई, कोलकाता व गुजरातला नमवले. घरच्या मैदानात खेळताना लखनऊचे पारडे नक्कीच जड असेल. येथे १७० ते १८० धावांचा यशस्वी बचावही केला जाऊ शकतो.
पंतची बॅट शांत असली तरी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला निकोलस पूरन भन्नाट फॉर्मात आहे. त्याशिवाय मिचेल मार्श, आयुष बदोनी, एडीन मार्करम उत्तम लयीत आहेत. गोलंदाजीत शार्दूल ठाकूर व लेगस्पिनर दिग्वेश राठी यांच्यावर लखनऊची भिस्त आहे. रवी बिश्नोई, आवेश खान व आकाश दीप यांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे.