IPL 2025 - CSK vs PBK : पंजाबच्या प्रियांशचा शतकी तडाखा

२४ वर्षीय डावखुरा सलामीवीर प्रियांश आर्यने मंगळवारी ४२ चेंडूंत १०३ धावांची शतकी खेळी साकारली.
IPL 2025 - CSK vs PBK : पंजाबच्या प्रियांशचा शतकी तडाखा
एक्स @ShreyasIyer15
Published on

मुल्लानपूर : २४ वर्षीय डावखुरा सलामीवीर प्रियांश आर्यने मंगळवारी ४२ चेंडूंत १०३ धावांची शतकी खेळी साकारली. त्याने साकारलेल्या कारकीर्दीतील पहिल्या शतकाच्या बळावर पंजाब किंग्जने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध २० षटकांत ६ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला.

मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पहिल्या षटकापासूनच आक्रमण केले. चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना प्रियांशने पॉवरप्लेमध्येच पंजाबला ७५ धावांपर्यंत नेले. दुसऱ्या बाजूने प्रभसिमरन सिंग (०), कर्णधार श्रेयस अय्यर (९) व मार्कस स्टोइनिस (४) यांनी निराशा केलेली असतानाही प्रियांश मात्र थांबला नाही. खलिल अहमदने श्रेयस व स्टोइनिसला बाद केले.

अखेरीस ३९व्या चेंडूवर चौकार वसूल करून त्याने आयपीएलच्या इतिहासात शतक झळकावणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा भारतीय फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. त्याने ७ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली. अखेर शतक झळकावल्यावर १४व्या षटकात नूर अहमदने प्रियांशला बाद केले.

नेहल वधेरा (९) व ग्लेन मॅक्सवेल (१) यांना रविचंद्रन अश्विनने एकाच षटकात बाद केले. मात्र शशांक सिंगने पुन्हा आपले महत्त्व सिद्ध करताना ३६ चेंडूंत नाबाद ५२ धावा फटकावल्या. तसेच मार्को यान्सेनने १९ चेंडूंत नाबाद ३४ धावा केल्या. या दोघांनी ६ बाद १५४ धावांवरून सातव्या विकेटसाठी ६५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे पंजाबने २१९ धावा फटकावल्या.

logo
marathi.freepressjournal.in