
चेन्नई : चेपॉकच्या मैदानात बुधवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. एकीकडे चेन्नईचा संघ स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी झटत आहे, तर दुसरीकडे पंजाबचा संघ बाद फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यासाठी आतुर आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई ९ पैकी फक्त २ सामने जिंकले असून तूर्तास ते गुणतालिकेत तळाच्या १०व्या स्थानी आहेत. गेल्या लढतीत चेन्नईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता उर्वरित पाचही सामन्यांत विजय मिळवणे चेन्नईसाठी अनिवार्य आहे. याशिवाय त्यांना अन्य निकालांवरही अवलंबून रहावे लागेल.
दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणारा पंजाबचा संघ ९ सामन्यांतील पाच विजय आणि १ रद्द लढतीच्या ११ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. पंजाबची गेली लढत पावसामुळे रद्द झाली, तर त्यापूर्वी त्यांना बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता हा संघही विजयपथावर परतण्यास आतुर असेल.
चेन्नईची फलंदाजीची भिस्त मुंबईकर आयुष म्हात्रे, युवा डेवाल्ब ब्रेविस आणि शिवम दुबे यांच्यावर आहे. तसेच रवींद्र जडेजा व धोनी असे अनुभवी फलंदाजही त्यांच्याकडे आहेत. मात्र दडपणाखाली हा संघ यंदा ढेपाळत आहे. गोलंदाजीत फिरकीपटू नूर अहमद चेन्नईसाठी हुकमी एक्का असेल. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक असून येथे धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. त्यामुळे नूरसह अश्विन व जडेजा प्रभावी ठरू शकतात.
पंजाबचे सलामीवीर प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग उत्तम लयीत आहे. मात्र नेहल वधेरा, शशांक सिंग यांचा संघाने योग्य वापर करणे गरजेचे आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल सातत्याने अपयशी ठरत आहे. कर्णधार श्रेयसलाही गेल्या काही सामन्यांत छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीत युझवेंद्र चहल व अर्शदीप सिंग यांच्यावर पंजाबची मदार आहे. मार्को यान्सेनही उत्तम लयीत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, वंश बेदी, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३१ सामन्यांपैकी चेन्नईने १६, तर पंजाबने १५ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांत आकडेवारीनुसार कमालीची चुरस असल्याचे पाहायला मिळते. यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामन्यात पंजाबने चेन्नईला प्रियांशच्या शतकामुळे सहज नमवले होते.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप