DC vs KKR : कोटलावर दिल्लीच्या फलंदाजांचा कस! विजयपथावर परतण्याचे आव्हान; आज सातत्याने संघर्ष करणाऱ्या कोलकाताशी लढत

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी रंगणाऱ्या लढतीत अरुण जेटली स्टेडियम म्हणजेच कोटलाच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांचा कस लागणार आहे.
DC vs KKR : कोटलावर दिल्लीच्या फलंदाजांचा कस! विजयपथावर परतण्याचे आव्हान; आज सातत्याने संघर्ष करणाऱ्या कोलकाताशी लढत
Published on

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी रंगणाऱ्या लढतीत अरुण जेटली स्टेडियम म्हणजेच कोटलाच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांचा कस लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ मंगळवारी विजयपथावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. तसेच दोन्ही संघांत प्रतिभावान फिरकीपटूंचा भरणा असल्याने चाहत्यांना त्यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळेल.

अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणारा दिल्ली संघ एकवेळ सलग चार विजयांसह गुणतालिकेत अग्रस्थानी होता. मात्र गेल्या पाच लढतींमध्ये दिल्लीला ३ पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे तूर्तास ९ सामन्यांतील ६ विजयांसह दिल्लीचा संघ चौथ्या स्थानी आहे. मुख्य म्हणजे कोटला येथे यंदाच्या हंगामात झालेल्या तीनपैकी २ सामन्यांत दिल्ली पराभूत झाली आहे, तर एक लढत त्यांनी सुपर-ओव्हरमध्ये जिंकली. त्यामुळे स्पर्धा निर्णायक वळणावर असताना दिल्लीचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. कोटलाच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर त्यांच्या फलंदाजांकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

दुसरीकडे मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणारा कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या पाचपैकी कोलकाताने फक्त एक लढत जिंकली आहे, तर त्यांचा पंजाबविरुद्धचा गेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे ९ सामन्यांतील फक्त ७ गुणांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. पुढील पाचही लढत जिंकल्या, तरच कोलकाताला आगेकूच करता येऊ शकते. त्यांच्याही फलंदाजांना अद्याप चमक दाखवता आलेली नाही. दिल्लीच्या फिरकी त्रिकुटाविरुद्ध कोलकाताचा कस लागेल.

दरम्यान, कोटलाचे मैदान सीमारेषेच्या तुलनेत लहान आहे. येथे दवसुद्धा मोठ्या प्रमाणात येते. मात्र खेळपट्टी काहीशी संथ असल्याने येथे धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागत आहे. ३ पैकी २ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर रविवारी बंगळुरूने येथे १६३ धावांचा पाठलाग करताना १९व्या षटकापर्यंत वाट पाहिली. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीस प्राधान्य देऊ शकतो. कुलदीप यादव, अक्षर व विपराज निगम यांचे फिरकी त्रिकुट विरुद्ध सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, मोईन अली या त्रिकुटाची कामगिरी सामन्याचा निकाल ठरवेल.

राहुल, अक्षर, फॅफवर दिल्लीची भिस्त

दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने के. एल. राहुल, डावखुरा अक्षर व सलामीवीर फॅफ डुप्लेसिस यांच्यावर आहे. गेल्या सामन्यात राहुल व डुप्लेसिसने संथ फलंदाजी केल्याचा संघाला फटका बसला. डुप्लेसिस दुखापतीतून सावरला असला, तरी पूर्णपणे लयीत दिसलेला नाही. अभिषेक पोरेल व करुण नायर यांनी मोठी खेळी साकारणे गरजेचे आहे. आशुतोष शर्मालाही एखादी लढत वगळता अपेक्षेप्रमाणे ‘फिनिशर’ची भूमिका बजावता आलेली नाही. गोलंदाजीत मिचेल स्टार्कवर दिल्ली अवलंबून आहे. कुलदीप यादव त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरत आहे. अक्षर फलंदाजीपेक्षा गोलंदाजीत उल्लेखनीय योगदान देत आहे. मुकेश कुमारऐवजी दिल्ली नटराजनला संधी देऊ शकते. गेल्या सामन्यात १२ चेंडूंत १८ धावांचा बचाव करायचा असताना स्टार्कऐवजी अक्षरने मुकेशच्या हाती चेंडू सोपवला. दिल्लीने ही लढत १९व्या षटकातच गमावली. त्यामुळे अक्षरच्या नेतृत्वाकडेही सर्वांचे लक्ष असेल.

फिरकीपटूंकडून कोलकाताला चमकदार कामगिरीची आशा

कोलकाता संघाला कर्णधार रहाणे व अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेल यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. त्याशिवाय रिंकू सिंगलाही छाप पाडता आलेली नाही. वेंकटेश अय्यर, अंक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल अशी खोलवरी पसरलेली फलंदाजी कोलकाताकडे आहे. मात्र त्यांना दडपणात धावा करण्यात अपयश येत आहे. गोलंदाजीत सुनील नरिन व वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंवर कोलकाताची भिस्त आहे. तसेच हर्षित राणा व वैभव अरोरा ही भारतीय वेगवान जोडी धावांची लयलूट करत आहे. अशा स्थितीत कोलकातापुढे एकंदर सांघिक कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल.

गंभीरची ड्रेसिंग रूममध्ये उणीव : हर्षित

कोलकाता संघाच्या ताफ्यात अनुभवी प्रशिक्षकांचा भरणा आहे. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, मार्गदर्शक ड्वेन ब्राव्हो त्यांच्याकडे आहेत. तसेच सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायरही पुन्हा परतला आहे. मात्र ड्रेसिंग रूममधील वातावरणात माजी प्रशिक्षक गौतम गंभीरची उ‌णीव जाणवत आहे, अशी कबुली कोलकाताचाच वेगवान गोलंदाज हर्षित राणाने व्यक्त केली. मात्र हे फक्त त्याचे वैयक्तिक मत असल्याचेही तो म्हणाला. तसेच अनुभवी प्रशिक्षकीय त्रिकुटाचा लाभ उचलून कोलकाताचा संघ उर्वरित हंगामात पुनरागमन करेल, असा विश्वास हर्षितने व्यक्त केला.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३४ सामन्यांपैकी कोलकाताने १८, तर दिल्लीने १५ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज असल्याचे दिसते. मात्र सध्याची कामगिरी पाहता दिल्लीचे पारडे या लढतीत नक्कीच जड आहे, असे म्हणता येईल.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in