
नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीसमोर अनफॉर्मचा सामना करणारा मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मासह संपूर्ण संघाचा कस लागणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात निराशाजनक सुरुवात करणाऱ्या मुंबईचा सामना रविवारी दिल्लीशी होणार आहे. मुंबईचे वेगवान अस्त्र जसप्रीत बुमरा परतल्याने फॉर्मात असलेल्या केएल राहुलसह दिल्लीच्या फलंदाजांची त्याच्यासमोर कसोटी आहे.
दिल्लीच्या संघाने हंगामाची सुरुवात दणक्यात केली आहे. हंगामात त्यांनी आतापर्यंतच्या चारही लढती जिंकल्या आहेत. पाचव्या सामन्यात त्यांच्यासमोर मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणारा मुंबईचा संघ आपल्या सहाव्या लढतीत दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.
रोहितला या सामन्यात धावांची बरसात करावी लागेल. त्याचा अनफॉर्म संघासाठी अडचणीचे ठरत आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांत रोहितने केवळ ३८ धावा जोडल्या आहेत.
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या दिल्लीच्या फिरकी गोलंदाजांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. कुलदीप यादव आणि विपराज निगम यांनी प्रभावी गोलंदाजी केली आहे.
स्पर्धेत कामगिरीच्या आतापर्यंतच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने कुलदीपला उत्कृष्ट गोलंदाज म्हटले आहे. प्रत्येक सामन्यात त्याने आपला गोलंदाजीचा कोटा पूर्ण केला आहे. त्याने ८ विकेट मिळवले असून ६ पेक्षा कमी सरासरीने धावा दिल्या आहेत. तसेच विपराज हा अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे आला आहे. त्याने आतापर्यंत ५ विकेट मिळवल्या आहेत.
बुमराहचे आव्हान
दुखापतीमुळे ३ महिन्यांनंतर पुनरागमन झालेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पहिल्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. बुमराच्या पुनरागमनामुळे दिल्लीच्या फलंदाजांसमोर दबाव असणार आहे. दिल्लीच्या वरच्या फळीतील गोलंदाजांना बुमराच्या गोलंदाजीचे आव्हान असेल. खासकरून फॉर्मात असलेला केएल राहुल आणि बुमरा यांच्यातील लढतीवर चाहत्यांच्या नजरा असतील.
मुंबई इंडियन्स
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
दिल्ली कॅपिटल्स
अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप