आज चुकीला माफी नाही! एलिमिनेटर लढतीत मुंबईचा गुजरातशी मुकाबला; पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आरपारची लढाई होणार आहे. ‘एलिमिनेटर’ लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मुल्लानपूरच्या (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चुकीला आता माफी नसेल.
आज चुकीला माफी नाही! एलिमिनेटर लढतीत मुंबईचा गुजरातशी मुकाबला; पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार
Published on

मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आरपारची लढाई होणार आहे. ‘एलिमिनेटर’ लढतीत उभय संघ आमनेसामने येणार असून पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मुल्लानपूरच्या (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चुकीला आता माफी नसेल.

नुकताच भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त झालेल्या शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरातचा संघ खेळत आहे. गुजरात एकवेळ साखळी स्पर्धेत अग्रस्थानी होता. मात्र निर्णायक क्षणी त्यांनी दोन लढती गमावल्याने गुजरातची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. १४ पैकी गुजराते ९ सामने जिंकून तिसरे स्थान पटकावले. २०२२पासून आयपीएलचा भाग असलेल्या गुजरातने पहिल्याच वर्षी स्पर्धा जिंकली, तर २०२३मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता मुंबईला नमवण्यासह रविवारी क्वालिफायर-२ जिंकत एकंदर तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी गुजरातचा संघ उत्सुक असेल.

दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने साखळी फेरीत चौथे स्थान मिळवले. मुंबईकडेही अव्वल दोन संघांत प्रवेश करण्याची संधी होती. मात्र अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुंबईला १४ सामन्यांतील ८ विजयांच्या १६ गुणांसह चौथ्या स्थानीच समाधान मानावे लागले. मुंबईने आतापर्यंत एकदाही तिसऱ्या अथवा चौथ्या स्थानावरून आयपीएल जिंकलेली नाही. सहा वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबईने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे. मात्र त्यावेळी रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार असायचा, तर हार्दिकने २०२२मध्ये गुजरातचे नेतृत्व करताना त्यांना जेतेपदापर्यंत नेले होते. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाचा पुन्हा कस लागेल.

सूर्यकुमार, बोल्टवर मुंबईची भिस्त

मुंबईसाठी या हंगामात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६४० धावा केल्या आहेत. मुख्य म्हणजे सूर्याने ५ अर्धशतके झळकावली असून एकदाही तो २५ धावांच्या आत बाद झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सूर्यकुमारच्या कामगिरीवर लक्ष असेल. रोहित, तिलक वर्मा व हार्दिक यांना मात्र कामगिरी उंचावण्याची गरज आहे. त्यातच रायन रिकल्टन व विल जॅक्स आता संघाचा भाग नसल्याने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोकडून चमकदार फलंदाजी अपेक्षित आहे. नमन धीर सातत्याने छाप पाडत आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा व ट्रेंट बोल्ट या वेगवान जोडीवर मुंबईची मदार आहे. बोल्टने पॉवरप्लेमध्ये विकेट मिळवल्यास मुंबईने बहुतांशी सामने जिंकले आहेत. दीपक चहर या लढतीस मुकण्याची शक्यता असल्याने अश्वनी कुमारला मुंबई संधी देऊ शकते. मिचेल सँटनरकडून मुंबईकरांना आशा आहेत.

प्रसिध, सुदर्शन, गिल गुजरातचे तारणहार

यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला साई सुदर्शन (६७९ धावा) व पर्पल कॅपच्या शर्यतीत २३ बळींसह दुसऱ्या स्थानी असलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा हे दोन खेळाडू गुजरातचे आधारस्तंभ आहेत. त्याशिवाय कर्णधार गिलही उत्तम फॉर्मात आहे. जोस बटलरची अनुपस्थिती गुजरातला जाणवू शकते. शर्फेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरूख खान यांनी फलंदाजीत जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. गोलंदाजी मात्र गुजरातसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या दोन्ही साखळी सामन्यांत गुजरातने २००हून अधिक धावा लुटल्या. रशिद खान पूर्णपणे अपयशी ठरत आहे, तर मोहम्मद सिराज, अर्शद खान यांना धावा रोखता येत नाही. कगिसो रबाडा नसल्याने जेराल्ड कोएट्झेवर जबाबदारी वाढली आहे. प्रसिधची गोलंदाजी निर्णायक ठरू शकते.

तब्बल दोन तासांचा अतिरिक्त वेळ

आयपीएलच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी तब्बल दोन तासांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिराने सुरू झाला अथवा मध्ये थांबवण्यात आला, तरी रात्री १ वाजेपर्यंत सामना संपवण्याची मुभा आहे. तसेच सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. लढतीवर पावसाचे सावट नसले, तरी बीसीसीआयने मात्र त्यांच्याकडून सर्व खबरदारी बाळगली आहे.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

मुल्लानपूर येथे यंदाच्या हंगामात झालेल्या चार सामन्यांपैकी (पंजाब-बंगळुरू लढतीपूर्वी) ३ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. त्यापैकी २ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २००चा पल्ला गाठला, तर एकदा पंजाबने येथे १११ धावा करूनही कोलकाताला ९५ धावांत गुंडाळले. दवाचा येथे फारसा प्रभाव जाणवणार नाही. तसेच पावसाची शक्यता नसली, तरी वातावरण मात्र काहीसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मिचेल सँटनर, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, रघू शर्मा, जॉनी बेअरस्टो, चरिथ असलंका, रिचर्ड ग्लीसन.

  • गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका, कुशल मेंडिस.

५-२

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांपैकी गुजरातने ५, तर मुंबईने फक्त २ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार गुजरातचे पारडे जड असून यंदाच्या हंगामातील दोन्ही साखळी लढतींत गुजरातने मुंबईला नमवले आहे. त्यामुळे यावेळी मुंबई पलटवार करणार की गुजरात पुन्हा एकदा बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

  • वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in