IPL 2025 : नवे आहेत, पण छावे आहेत! IPL च्या १८व्या हंगामात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम सुरू होऊन बरोबर एक महिना उलटला आहे. या हंगामात अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत नव्या दमाच्या खेळाडूंनी लक्ष वेधले आहे, असे म्हणता येईल.
IPL 2025 : नवे आहेत, पण छावे आहेत! IPL च्या १८व्या हंगामात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची आतापर्यंत लक्षवेधी कामगिरी
Published on

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८वा हंगाम सुरू होऊन बरोबर एक महिना उलटला आहे. या हंगामात अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत नव्या दमाच्या खेळाडूंनी लक्ष वेधले आहे, असे म्हणता येईल. त्यातही पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळणाऱ्या असंख्य युवकांनी भरारी घेतली आहे. मुंबई इंडियन्सचा चायनामन फिरकीपटू विघ्नेश पुथूर, चेन्नईकडून खेळणारा मुंबईकर आयुष म्हात्रे, राजस्थानचा १४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि पंजाब किंग्जचा डावखुरा प्रियांश आर्य ही यांपैकीच काही नावे.

केरळच्या २४ वर्षीय पुथूरने संधी मिळालेल्या ४ सामन्यांत ६ बळी मिळवले आहेत. विशेषत: पहिल्याच लढतीत त्याने चेन्नईविरुद्ध ३ बळी मिळवून छाप पाडली. आतापर्यंत केरळसाठी एकही स्थानिक सामना न खेळलेल्या विघ्नेशचा शोध घेण्याचे श्रेय मुंबईच्या चमूला नक्कीच द्यावे लागेल.

यंदाच्या हंगामात ८ सामन्यांत एका शतकासह २५४ धावा करणारा प्रियांश अल्पावधीतच पंजाबसाठी तारणहार म्हणून उदयास आला आहे. मूळचा दिल्लीकर असलेल्या २३ वर्षीय प्रियांशचा स्ट्राइक रेट हा २०० पेक्षाही अधिक आहे. कामगिरीत सातत्य राखल्यास तो लवकरच भारतीय संघातही स्थान मिळवू शकेल.

मुंबईविरुद्ध वानखेडे मैदानावर २० एप्रिल रोजी १७ वर्षीय आयुषने चेन्नईसाठी दमदार फलंदाजी केली. १५ चेंडूंतच ४ चौकार व २ अप्रतिम षटकारांच्या बळावर आयुषने ३२ धावा फटकावल्या. आयुषच्या पदार्पणात चेन्नईला सामना जिंकता आला नाही. मात्र त्याच्यात कितपत कौशल्य आहे, याची एक झलक चाहत्यांना दिसली. विरार ते वानखेडेपर्यंतचा आयुषचा प्रवास स्वप्नवत आहे.

नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुलगा म्हणजे १४ वर्षीय वैभव. लखनऊविरुद्धच्या लढतीत सलामीला आलेल्या डावखुऱ्या वैभवने पहिल्याच चेंडूवर शार्दूल ठाकूरला षटकार लगावला. २० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह वैभवने ३४ धावा फटकावल्या. त्याच्या फटकेबाजीनंतरही राजस्थानचा संघ पराभूत झाला. मात्र भविष्यात वैभवसह असंख्य युवा खेळाडू आयपीएलच्या मंचावर चमकत राहतील, याची खात्री पटली. याव्यतिरिक्त, अश्वनी कुमार (मुंबई), दिग्वेश राठी (लखनऊ) यांनीही यंदा दमदार पदार्पण केले.

logo
marathi.freepressjournal.in