
गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (दि.०३) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. या सामन्यात बाजी मारून गेल्या १८ वर्षांचा आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ कोण संपुष्टात आणणार, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, हवामानाच्या अंदाजामुळे दोन्ही संघांच्या योजनांवर आणि चाहत्यांच्या उत्सुकतेवरही विरजण पडू शकते.
अहमदाबादमध्ये संध्याकाळी पावसाची शक्यता
अहमदाबादमध्ये मंगळवारी पावसाची तुरळक शक्यता वर्तवण्यात आली आहे. अॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार, अहमदाबादमध्ये दिवसभर पावसाची शक्यता नसली तरी संध्याकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान तुरळक सरी बरसू शकतात. पाऊस पडला तरी ९.३० वाजेपर्यंत पूर्ण २०-२० षटकांचा सामना खेळवण्याची मुभा आहे. त्याशिवाय लढतीसाठी उद्याचा अतिरिक्त दिवसही राखीव म्हणून ठेवण्यात आला आहे.
पावसामुळे राखीव दिवसाचाही खेळ रद्द झाल्यास काय?
तथापि, उद्याही जर पावसामुळे सामना रद्द झाल्यास मात्र श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्ज संघाचे नशीब फळफळणार आहे. कारण, गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे पंजाब किंग्जला विजयी घोषित केले जाईल.
बंगळुरू परंपरा कायम ठेवणार, की पंजाबसाठी अहमदाबाद पुन्हा लकी ठरणार?
उभय संघांत यंदाच्या हंगामातील तीन सामन्यांत (दोन साखळींत, एक बाद फेरीत) बंगळुरूने दोनदा, तर पंजाबने एकदा विजय मिळवला. मात्र पंजाबने अहमदाबाद येथे यंदाच्या हंगामात दोन्ही सामने (गुजरात, मुंबईविरुद्ध) जिंकले आहेत. तर बंगळुरूचा संघ या हंगामात मंगळवारी प्रथमच अहमदाबाद येथे खेळणार आहे. बंगळुरूने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे ते ही परंपरा कायम राखणार की पंजाबसाठी अहमदाबाद पुन्हा लकी ठरणार, याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागून आहे.
प्रथम फलंदाजीला प्राधान्य?
अहमदाबादमध्ये यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या ८ पैकी ६ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर फक्त दोन वेळा धावांच्या पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. अहमदाबादमध्ये २०० ते २२० धावांचा पाठलाग करणेही सोपे जाऊ शकते. मात्र अंतिम फेरीसाठी कोणती खेळपट्टी वापरण्यात येणार, यावर सारे काही अवलंबून आहे. येथे दव मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे गोलंदाजांची समस्या वाढू शकते.
मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना पंजाबने यंदा अफलातून कामगिरी केली आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या क्वालिफायर-२ लढतीत त्यांनी पाच वेळच्या विजेत्या मुंबईला ५ गडी राखून सहज धूळ चारली. कर्णधार श्रेयसने लौकिकाला साजेशी खेळी साकारून पंजाबला तब्बल ११ वर्षांनी अंतिम फेरी गाठून दिली. २०१४मध्ये पंजाबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबचा संघ प्रथमच चषक उंचावण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने स्वप्नवत वाटचाल करताना ९ वर्षांनी पुन्हा, तर एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २००९, २०११ व २०१६मध्ये बंगळुरूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यंदा तारांकित फलंदाज विराट कोहलीसह तमाम बंगळुरूच्या चाहत्यांची स्वप्नपूर्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच बंगळुरूने क्वालिफायर-१ लढतीत पंजाबचा धुव्वा उडवून थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती. आता पुन्हा एकदा पंजाबला नमवून १८व्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी उंचावण्याचे बंगळुरूचे स्वप्न असेल.