मुंबई किंवा अहमदाबादला आयपीएलचा अंतिम सामना; 'ईडन गार्डन'ची संधी जाणार!

२२ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा हंगाम गेल्या आठवड्यात स्थगित करण्यात आला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला. मात्र आता स्थिती नियंत्रणात असल्याने १७ मेपासून पुन्हा आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरू होईल.
ईडन गार्डन
ईडन गार्डनएक्स
Published on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८व्या हंगामाचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम किंवा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अंतिम निर्णय घेईल.

२२ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा हंगाम गेल्या आठवड्यात स्थगित करण्यात आला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला. मात्र आता स्थिती नियंत्रणात असल्याने १७ मेपासून पुन्हा आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरू होईल. त्यापैकी २७ मेपर्यंत रंगणाऱ्या साखळी सामन्यांसाठी शहरांची निवड झालेली असून बीसीसीआयने त्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

मात्र २९ मेपासून रंगणाऱ्या बाद फेरीसाठी अद्याप ठिकाणे निश्चित झालेली नाहीत. वातावरणाचा अंदाज व सुरक्षा व्यवस्था पाहता मुंबई किंवा अहमदाबादला यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. आधीच्या वेळापत्रकानुसार क्वालिफायर-१ व एलिमिनेटरची लढत हैदराबादला, तर क्वालिफायर-२ व अंतिम सामना कोलकात्याच्या 'ईडन गार्डन' येथे होणार होता. मात्र आता क्वालिफायर-१ व एलिमिनेटर मुंबईत, तर क्वालिफायर-२ व अंतिम सामना अहमदाबादला होऊ शकतो. सध्या चेन्नई, कोलकाता, पंजाब येथील शहरांत कोणताही सामना आयोजित नाही. बीसीसीआय अत्यंत विचारपूर्वक शहरांची निवड करून तेथे सामन्यांचे आयोजन करेल.

मुस्तफिझूर दिल्लीच्या संघात

जेक फ्रेसर मॅकगर्कने आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी भारतात परतण्यास नकार दर्श‌वला आहे. त्यामुळे त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्स संघाने बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानची निवड केली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे विदेशी खेळाडू आपापल्या मायदेशी परतले होते. मात्र आता आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ ११ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे मिचेल स्टार्कही भारतात परतण्याबाबत संभ्रम कायम आहे. अशा स्थितीत मुस्तफिझूर स्टार्कची जागा घेऊ शकतो.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मनाई

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने त्यांच्या सर्व खेळाडूंना २६ मेपर्यंत मायदेशी परतण्यास सांगितले आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २५ मे रोजी आयपीएलची अंतिम फेरी रंगणार होती. त्यामुळे आफ्रिकन क्रिकेट मंडळाने सर्व खेळाडूंना अंतिम फेरीपर्यंत भारतात राहण्याची मुभा दिली होती. मात्र आता ३ जूनपर्यंत आयपीएल लांबणार आहे. ११ जूनपासून आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटीची अंतिम लढत खेळणार आहे. त्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळून खेळाडूंना किमान १२ ते १५ दिवस सराव करता यावा, या हेतूने सर्व आफ्रिकन खेळाडूंना त्यांच्या मंडळाने २६ मेपर्यंत बोलावले आहे. मुंबईचा रायन रिकल्टन, कॉर्बिन बोश, पंजाबचा मार्को यान्सेन, बंगळुरूचा लुंगी एन्गिडी, लखनऊचा एडीन मार्करम हे खेळाडू त्यामुळे बाद फेरीला मुकू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in