गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान; कोलकाताची हैदराबादशी गाठ

गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न गुजरात टायटन्स संघाचा असेल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गटातील अखेरच्या लढतीत रविवारी गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान असेल.
गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान; कोलकाताची हैदराबादशी गाठ
Published on

अहमदाबाद : गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न गुजरात टायटन्स संघाचा असेल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गटातील अखेरच्या लढतीत रविवारी गुजरातसमोर चेन्नईचे आव्हान असेल. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास गुजरातचा संघ २० गुणांसह अव्वल दोन संघांत राहील.

चेन्नईच्या संघाचे प्ले ऑफ प्रवेशाचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी यंदाच्या हंगामाचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न चेन्नईचा असू शकतो.

शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या तिकडीच्या फॉर्ममुळे गुजरातने हंगामात शानदार कामगिरी केली आहे.

रविवारच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला तरी ते गुणतालिकेत तळाशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना आयुष म्हात्रे, उर्विल पटेल आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांसारख्या नवोदित खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल.

कोलकाताची हैदराबादशी गाठ

नवी दिल्ली : सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न कोलकाता नाईट रायडर्स संघाचा असेल. रविवारी हे दोन संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अखेरच्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र हंगामातील अखेरची लढत जिंकून हंगामाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या हैदराबादच्या संघात ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, अनिकेत वर्मा अशी तगडी फलंदाजी आहे. कोटलाच्या फलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्टीवर धावांचा डोंगर उभारण्यासाठी हैदराबादचा संघ उत्सुक आहे. कोलकाताचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील १७ मे रोजी आरसीबीविरुद्ध सामना खेळणार होता. परंतु बंगळुरूमधील हवामानाने त्यांचा खेळ खराब केला. खराब हवामानामुळे त्यांच्या प्ले-ऑफच्या आशांनाही पूर्णविराम दिला. हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी असून या लढतीनंतर त्यांच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in