
अहमदाबाद : प्रतिभावान अष्टपैलू हार्दिक पंड्या शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रणांगणात परतणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सशी रंगणाऱ्या दुसऱ्या साखळी सामन्यात कर्णधार हार्दिकचे पुनरागमन मुंबई इंडियन्ससाठी लाभदायी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल. दोन्ही संघांमध्ये या लढतीत गुणांचे खाते उघडण्यासाठी जोरदार झुंज पाहायला मिळेल.
गेल्या आठवड्यापासून आयपीएलच्या १८व्या हंगामाला धडाक्यात प्रारंभ झाला. मात्र पाच वेळच्या विजेत्या मुंबईने यंदाही पराभवाने या पर्वाची सुरुवात केली. २०२४च्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात षटकांची गती संथ राखल्यामुळे हार्दिकवर एका सामन्याची बंदी टाकण्यात आली होती. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईने चेन्नईकडून पराभव पत्करला. आता मात्र हार्दिक मुंबईच्या संघात परतला असून नेतृत्वासह अष्टपैलू म्हणून छाप पाडण्यास तो आतुर असेल. गुजराती छोरा असलेला हार्दिक २०२२ व २०२३ या हंगामात गुजरातकडूनच आयपीएलमध्ये खेळला होता. त्यामुळे तो येथील खेळपट्टीचे स्वरूप जाणून आहे. आता २०२४मधील अपयश बाजूला सारून हार्दिक आणि मुंबई एक नवी सुरुवात करण्यास आतुर असतील.
दुसरीकडे युवा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातला सलामीच्या लढतीत पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. पंजाबने उभारलेल्या २४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने २३२ धावांपर्यंत मजल मारली. २०२२च्या विजेत्या गुजरातला २०२३मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. तर २०२४मध्ये त्यांना बाद फेरी गाठता आली नाही. त्यामुळे आता काही नव्या दमाच्या खेळाडूंसह संघबांधणी करण्याचे गुजरातपुढे आव्हान असेल. घरच्या मैदानात ते सलग दुसरा सामना खेळणार असून येथे दव मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे नाणेफेक जिंकून बहुतांश संघ येथे प्रथम गोलंदाजी स्वीकारतात.
पुथूर, चहर, बोल्टवर गोलंदाजीची मदार
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा असे फलंदाज संघात असूनही मुंबईला पहिल्या सामन्यात जेमतेम १५० धावाच करता आल्या. आता हार्दिकच्या परतण्याने मुंबईची फलंदाजी आणखी बळकट झाली असून आघाडीच्या फळीकडून दमदार सुरुवात अपेक्षित आहे. विल जॅक्स व रायन रिकेलटन यांच्यापैकी एकाला वगळून अतिरिक्त विदेशी वेगवान किंवा फिरकी गोलंदाज खेळवण्याचा पर्याय मुंबईपुढे आहे. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट व दीपक चहर या वेगवान जोडीवर मुंबईची भिस्त आहे. डावखुरा चायनामन फिरकीपटू विघ्नेश पुथूर पुन्हा एकदा प्रभावी ठरू शकतो. चेन्नईविरुद्ध त्याने ३ बळी मिळवले होते.
गिल, बटलरवर गुजरातची भिस्त
गुजरातची फलंदाजी प्रामुख्याने गिल व अनुभवी जोस बटलर यांच्यावर अवलंबून आहे. तसेच साई सुदर्शनही उत्तम लयीत आहे. बटलर व सुदर्शन यांनी पहिल्या सामन्यात अर्धशतके झळकावली होती. मधल्या फळीत ग्लेन फिलिप्सला गुजरातचा संघ संधी देऊ शकतो. राहुल तेवतिया, शाहरूख खान असे फटकेबाजही गुजरातकडे आहेत. गोलंदाजी गुजरातसाठी चिंतेचा विषय आहे. मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा, प्रसिध कृष्णा या वेगवान त्रिकुटाला फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर धावांचा बचाव करताना अथक परिश्रम घ्यावे लागतील. फिरकीपटू रशिद खान व आर. साईकिशोर मात्र त्यांच्यासाठी हुकमी एक्के ठरू शकतात.
- उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी गुजरातने ३, तर मुंबईने २ लढती जिंकल्या आहेत.
- गतवर्षी या संघांत झालेल्या एकमेव लढतीत गुजरातनेच अहमदाबाद येथे मुंबईला नमवले होते. यंदा मुंबईला त्या पराभवाचा वचपा घेण्याची उत्तम संधी आहे. २०२५मध्ये मुंबई-गुजरात दोन वेळा आमनेसामने येतील.
प्रतिस्पर्धी संघ
-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकेलटन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
-गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, ग्लेन फिलिप्स, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर.
-वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप