IPL 2025 : इंडिया का त्योहार आजपासून सुरू! कोलकाता-बंगळुरू लढतीने आयपीएलच्या १८व्या पर्वाला प्रारंभ; सामन्यावर पावसाचे सावट

ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर शनिवारपासून क्रिकेटचा कुंभमेळा सुरू होणार आहे.
IPL 2025 : इंडिया का त्योहार आजपासून सुरू! कोलकाता-बंगळुरू लढतीने आयपीएलच्या १८व्या पर्वाला प्रारंभ; सामन्यावर पावसाचे सावट
एक्स @IPL
Published on

कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर शनिवारपासून क्रिकेटचा कुंभमेळा सुरू होणार आहे. ‘इंडिया का त्योहार’ म्हणून लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८व्या पर्वातील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांचा हिरमोडही होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसी स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. त्यानंतर आता एकीकडे देशभरात शालेय परीक्षांचा हंगाम सुरू असला तरी आयपीएलच्या रणधुमाळीची सर्वांना उत्सुकता लागून आहे. विशेष म्हणजे यंदा भारताच्याच खेळाडूंना डिवचण्यापेक्षा त्यांचे कौतुकही केले जाईल. असंख्य कुटुंब, मित्रमंडळी एकत्रित येऊन आयपीएलचा आनंद लुटतील, हे नक्की. काही चाहत्यांमध्ये आपापल्या आवडत्या संघावरून शाब्दिक द्वंद्वही रंगेल, तर रात्री उशिरापर्यंत लांबलेल्या सामन्यांची दुसऱ्या दिवशी गल्लीबोळापासून प्रवासादरम्यान चर्चा रंगलेली पाहायला मिळेल. एकूणच यंदा आयपीएलला एका सणाप्रमाणे देशभरात साजरे केले जाईल. २२ मार्च ते २५ मे या ६५ दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत यंदाही १० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे ७४ सामन्यांनंतर कोणता संघ आयपीएलची ट्रॉफी उंचावणार, हे पाहणे रंजक ठरेल.

बीसीसीआयने यंदाही ७४ सामन्यांचे भारतातील १३ ठिकाणांवर आयोजन करण्याचे ठरवले आहे. ७० सामने हे साखळी फेरीतील असतील. तसेच १२ लढती शनिवार-रविवारी दुपारी होतील. नेहमीप्रमाणे दुपारच्या लढतींची वेळ ३.३०, तर सायंकाळच्या लढतींची वेळ ७.३० वाजता असेल. गतवर्षी कोलकाताने आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे त्यांना पहिल्या तसेच अंतिम सामन्याच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर लढत हैदराबाद येथे होईल. तर क्वालिफायर-२ व अंतिम सामना कोलकातामध्ये रंगणार आहे.

यंदा सहभागी १० संघांपैकी ५ संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. बंगळुरूचे रजत पाटीदार, दिल्लीचे अक्षर पटेल, कोलकाताचे अजिंक्य रहाणे, पंजाबचे श्रेयस अय्यर, तर लखनऊचे नेतृत्व ऋषभ पंत करताना दिसणार आहे. दुसरीकडे ऋतुराज गायकवाड (चेन्नई), हार्दिक पंड्या (मुंबई), पॅट कमिन्स (हैदराबाद), संजू सॅमसन (राजस्थान), शुभमन गिल (गुजरात) यांनी मात्र आपापले कर्णधार कायम राखले आहेत. त्यामुळे यावेळी आयपीएलला नवा विजेता लाभणार की यापूर्वी जिंकलेल्या संघांपैकीच कोणीतरी बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. २०२२ पासून आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश झाल्याने यंदाही त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीची ही अखेरची आयपीएल स्पर्धा असू शकते. त्यांच्याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या तारांकित खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये गर्दी करतील.

तूर्तास, शनिवारी सामन्यापूर्वी शानदार उद्घाटन सोहळाही रंगणार असून त्यासाठी बॉलिवूड तारकांची उपस्थिती असेल. मात्र शुक्रवारी कोलकाता संघाचे सराव सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले, तर शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पाऊस न पडल्यास चाहत्यांच्या निखळ मनोरंजनाला धडाक्यात प्रारंभ होईल. त्यामुळे चाहते आयपीएलचा आनंद लुटण्यासाठी सज्ज आहेत.

स्पर्धेचे स्वरूप कसे?

-यंदाही १० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे.

-प्रत्येक संघाला आपल्या गटातील अन्य संघांशी प्रत्येकी दोनदा खेळण्याची संधी मिळेल. त्याशिवाय आपल्या समोरील ओळीत असलेल्या संघाशीसुद्धा ते दोन वेळा खेळतील. (उदाहरणार्थ, मुंबई-चेन्नई वेगवेगळ्या गटात असले तरी ते एकमेकांसमोरील ओळीत असल्याने त्यांच्यात दोन लढती होतील.)

-प्रत्येक संघ विरोधी गटातील अन्य संघांशी एक लढत खेळणार आहे. गुणतालिका मात्र १० संघांची मिळून एकच असेल.

-साखळी फेरीअखेरीस आघाडीचे चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.

logo
marathi.freepressjournal.in