
हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला ७ गडी आणि २६ चेंडू राखून सहज धूळ चारली. मात्र या सामन्यात हैदराबादचा फलंदाज इशान किशनच्या कृत्याची क्रीडाविश्वात सध्या एकच चर्चा रंगली आहे. त्यामुळे किशनसह पंचांवरही टीका करण्यात येत आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ८ बाद १४३ अशी धावसंख्या उभारली. त्यातही हैदराबादची पॉवर प्लेमध्येच ५ बाद ३५ अशी स्थिती होती. या लढतीच्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर दीपक चहरने किशनला बाद केले. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने जात असल्याने पंचांनी प्रथम वाइडचा निर्णय दिला. मुंबईचे खेळाडूही यावेळी पुढील चेंडूसाठी सज्ज होत होते. मात्र इशान स्वत:हून निघत असल्याचे मुंबईच्या खेळाडूंनी पाहिले. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या व चहर यांनी उशिराने अपील केले.
इशानच्या बॅट किंवा ग्लोव्ह्जचा चेंडूला स्पर्श झाला असावा, असे त्यावेळी वाटले. त्यामुळे पंचांनीही लगेचच वाइडऐवजी एक बोट वर दाखवत किशनला बाद दिले. यावेळी मुंबईच्या खेळाडूंनी इशानची पाठ थोपटली. तसेच त्याने खिलाडूवृत्ती दाखवून स्वत:हून माघारी परतण्याचे ठरवल्याने कौतुक केले.
मात्र इशान डगआऊटमध्ये परतल्यावर लगेचच स्निको मीटरचा रिप्ले दाखवण्यात आला. त्यामध्ये चेंडू इशानच्या बॅट अथवा थाय पॅड, पाय कुठेही न लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इशानने मैदान का सोडले, त्याने रिव्ह्यू का नाही घेतला. तसेच पंचांनी कोणत्याही खेळाडूने जोरदार अपील न करता इशानला का बाद ठरवले, तिसऱ्या पंचांनी इशान मैदानात असतानाच त्याला का नाही थांबवले, असे असंख्य प्रश्न काही चाहते व माजी क्रिकेटपटू विचारत आहेत.
तूर्तास, इशानच्या कृत्यामुळे काहींनी यामागे फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे. तसेच इशान यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. म्हणूनच त्याने आपल्या पूर्वीच्या संघावर मेहेरबानी केले, असेही मत नोंदवले. तर काहींनी पंचांना यासाठी जबाबदार धरले. मात्र काही सुजाण चाहत्यांनी हे सर्व काही नकळत घडल्याचे सांगितले. यामध्ये इशानलासुद्धा चुकीचे धरता येणार नाही, किंवा पंचांना दोष देता येणार नाही, असे मत व्यक्त केले. त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे.