IPL 2025 : इशानचे वादळी शतक; हैदराबादचा राजस्थानवर ४४ धावांनी विजय

इशान किशनच्या वादळी खेळीपुढे राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांचे प्रयत्न अपुरे ठरले. सनरायजर्स हैदराबादने हा सामना ४४ धावांनी जिंकत आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात शानदार केली.
इशान किशन
१०६* धावा
इशान किशन १०६* धावाएक्स @IPL
Published on

हैदराबाद : इशान किशनच्या वादळी खेळीपुढे राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांचे प्रयत्न अपुरे ठरले. सनरायजर्स हैदराबादने हा सामना ४४ धावांनी जिंकत आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात शानदार केली.

ट्रॅविस हेडने ३१ चेंडूंत ६७ धावा फटकावत अभिषेक शर्माच्या साथीने संघाला चांगली सलामी करून दिली. इशान किशनने ४७ चेंडूंत नाबाद १०६ धावा फटकावत आपले इरादे स्पष्ट केले. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडत ४५ चेंडूंत शतक झळकावले. किशन हा नव्या फ्रँचायझीसोबत जोडला गेल्यानंतर पहिल्याच सामन्यात हैदराबादने ६ फलंदाज गमावून २८६ धावा तडकावल्या. आयपीएलच्या इतिहासात त्यांची ही दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली.

रॉयल्सचा संघही मागे नव्हता. त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ फलंदाज गमावून २४२ धावा केल्या. नेट रनरेटने धावा करण्यात त्यांना अपयश आले.

हैदराबादच्या खेळपट्टीवर राजस्थानचा फारसा अनुभव नसलेला कर्णधार रियान परागने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट आला.

सॅमसन (३७ चेंडूंत ६६ धावा) आणि जुरेल (३५ चेंडूंत ७० धावा) यांनी हैदराबादने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार फलंदाजी केली. या जोडीने ९.५ षटकांत १११ धावांची भागीदारी केली.

पहिल्या डावानंतर सनरायजर्स विजयाचा प्रबळ दावेदार होता. परंतु राजस्थाननेही शानदार फलंदाजी करत सामना रोमांचक वळणावर आणला होता. ११व्या आणि १२व्या षटकाने सामना सनरायजर्सच्या बाजूने वळवला.

११ व्या षटकात अॅडम झम्पा (चार षटकांत ४८ धावा देत १ विकेट) आणि १२ व्या षटकात पॅट कमिन्स (४ षटकांत ६० धावा) यांनी केवळ ७ धावा दिल्या.

वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (४ षटकांत २/३४) अप्रतिम गोलंदाजी केली. गोलंदाजांनी टाकलेल्या निर्धाव चेंडूंचा फरक निर्णायक ठरला.

हैदराबादचा संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा रॉयल्सने २५ निर्धाव चेंडू टाकले. कमिन्सच्या संघाने त्यापेक्षा १५ चेंडू अधिक निर्धाव टाकले. त्या दोन षटकांत निर्धाव चेंडू अधिक टाकल्याने रॉयल्सवर दबाव वाढला. १३ व्या षटकात जुरेलने सिमरजित सिंगला ३ षटकार लगावले. त्यावेळी हैदराबादवर दबाव वाढला होता. कर्णधाराने हर्षलच्या हाती चेंडू सोपवला आणि सामना आपल्या बाजूने वळवला.

हर्षलने सॅमसनला आपल्या सापळ्यात अडकवले. त्यानंतर पुढच्याच षटकात जुरेलचा अडथळा दूर करण्यात झम्पाला यश आले. सेट झालेली ही जोडी बाद झाल्यानंतर सामना हैदराबादच्या बाजूने वळला.

शेमरॉन हेटमायर (२३ चेंडूंत ४२ धावा) आणि शुभम दुबे (११ चेंडूंत नाबाद ३४ धावा) यांनी फटकेबाजी केली. मात्र धावा आणि चेंडू यातील अंतर वाढल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

जोफ्रा आर्चर या सामन्यात ४ षटकांत ७६ धावा देऊन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. हेडने पहिल्या १० षटकांमध्ये आणि किशनने अखेरच्या १० षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली.

सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ विकेट्स गमावत २८६ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या टॉप फलंदाजी फळीने रौद्ररूप धारण करत राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. किशनने शानदार फलंदाजी केली. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या २८७ धावा आहे, जी देखील सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. स्वत:चा विक्रम मोडण्यापासून हैदराबादचा संघ केवळ १ धाव मागे राहिला. यासह आयपीएल इतिहासातील ३ मोठ्या धावसंख्या उभारण्याचा विक्रम आता सनरायझर्स हैदराबादच्या नावावर झाला आहे.

किशनने ४५ चेंडूंत शतक ठोकून आयपीएलमधील त्याचे पहिले शतक झळकावले. या विजयामुळे हैदराबादने यंदाच्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली.

जोफ्रा आर्चरने या सामन्यात नकोसा विक्रम आपल्या नावे केला. तो आयपीएलमधील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. आर्चरने ४ षटकांत ७६ धावा मोजल्या.

logo
marathi.freepressjournal.in