CSK vs KKR : कोलकाताच्या मार्गात आयुषचा अडथळा! ईडन गार्डन्सवर आज गतविजेत्यांची चेन्नईशी गाठ; बाद फेरीच्या दृष्टीने विजय अनिवार्य

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी होणाऱ्या लढतीत गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडणार आहे.
CSK vs KKR : कोलकाताच्या मार्गात आयुषचा अडथळा! ईडन गार्डन्सवर आज गतविजेत्यांची चेन्नईशी गाठ; बाद फेरीच्या दृष्टीने विजय अनिवार्य
Published on

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) बुधवारी होणाऱ्या लढतीत गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्जशी गाठ पडणार आहे. चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी कोलकाता अद्यापही बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहे. त्यामुळे त्यांना घरच्या मैदानात म्हणजेच ईडन गार्डन्सवर होणारी ही लढत जिंकणे अनिवार्य असून चेन्नईकडून खेळणारा मुंबईकर आयुष म्हात्रे कोलकाताच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नईचा संघ ११ सामन्यांतील फक्त २ विजयांच्या ४ गुणांसह गुणतालिकेत तळाशी (१०व्या स्थानी) आहे. त्यामुळे आता पुढील हंगामाच्या दृष्टीने युवा खेळाडूंची चाचपणी करणे आणि क्रमवारीत वरच्या स्थानी असलेल्या संघांचे समीकरण बिघडवणे, हेच चेन्नईचे लक्ष्य आहे. त्यातही १७ वर्षीय आयुषच्या रूपात चेन्नईला भविष्यातील तारा गवसला आहे. ४ सामन्यांत आयुषने एका अर्धशतकासह १६३ धावा केल्या आहेत. विशेषत: बंगळुरूविरुद्ध त्याने ४८ चेंडूंत ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मात्र त्यानंतरही चेन्नईला २ धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईने सलग चार सामने गमावले असून आता उर्वरित ३ लढतींमध्ये ते प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळतील.

दुसरीकडे मुंबईच्याच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने निर्णायक वेळी लय मिळवून सलग दोन सामने जिंकले आहेत. तूर्तास ११ सामन्यांतील ५ विजय, ५ पराभव व १ रद्द लढत अशा एकूण ११ गुणांसह कोलकाताचा संघ सहाव्या स्थानी आहे. त्यांची धावगतीही उत्तम असून पुढील बुधवारी ते यंदाच्या हंगामात घरच्या मैदानातील अखेरची लढत खेळतील. कोलकाताचे यापुढील दोन सामने अनुक्रमे हैदराबाद व बंगळुरू येथे होतील. त्यामुळे घरच्या मैदानातील अखेरच्या सामन्यात चाहत्यांना विजयी भेट देण्याचे कोलकाताचे ध्येय असेल.

दरम्यान, ईडन गार्डन्सवर यंदा फिरकीपटूंना सहाय्य लाभले नाही. येथे यंदाच्या ६ सामन्यांपैकी ४ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान २०० धावांपर्यंत मजल मारली आहे. चार वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला असून एकदाच धावांचा पाठलाग झाला आहे.

रसेल, नरिन कोलकाताचे एक्के

निर्णायक वेळी लय गवसलेल्या आंद्रे रसेलने राजस्थानविरुद्ध २५ चेंडूंत नाबाद ५७ धावा फटकावल्या. त्यामुळे रसेलसह कोलकाताचा आत्मविश्वास बळावला असेल. सुनील नरिन अपेक्षेप्रमाणे अष्टपैलू योगदान देत आहे. या दोघांवरच कोलकाताची प्रामुख्याने भिस्त आहे. फलंदाजीत रहाणे, अंक्रिश रघुवंशी व वेंकटेश अय्यर यांच्याकडून कोलकाताला आशा आहे. रिंकू सिंग जायबंदी झाल्याने तो या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. गोलंदाजीत हर्षित राणा व वैभव अरोरा यांची वेगवान जोडी तसेच वरुण चक्रवर्ती व मोईन अली यांची फिरकी जोडी कोलकातासाठी निर्णायक ठरेल. खेळपट्टी फिरकीला पोषक नसली, तर मोईनला वगळून कोलकाताचा संघ अन्य फलंदाज किंवा वेगवान गोलंदाजांला संधी देऊ शकतो.

युवा खेळाडूंवर चेन्नईची भिस्त

चेन्नईच्या संघातील अनुभवी फलंदाजांनी निराशा केल्यामुळे त्यांना आता युवा खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. त्यातही आयुष, डेवाल्ड ब्रेविस व शेख रशीद यांच्यावर लक्ष असेल. रवींद्र जडेजा व शिवम दुबे फटकेबाजी करत असले, तरी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहेत. धोनीसाठी ईडन गार्डन्स व कोलकाता नेहमी खास राहिले आहे. बुधवारी त्याची येथील अखेरची लढत ठरू शकते. गोलंदाजीत मथिशा पाथिराना व फिरकीपटू नूर अहमद यांनी छाप पाडली आहे. मात्र डेथ ओव्हर्समधील खलिल अहमदची गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. बंगळुरूविरुद्ध चेन्नईने अखेरच्या २ षटकांत ५०हून अधिक धावा लुटल्या.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, आंद्रे सिद्धार्थ, अंशुल कंबोज, दीपक हुडा, डेवॉन कॉन्वे, जेमी ओव्हर्टन, कमलेश नागरकोटी, खलिल अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, श्रेयस गोपाळ, विजय शंकर, शेख रशीद, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३१ सामन्यांपैकी चेन्नईने १९, तर कोलकाताने ११ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. आकडेवारीनुसार चेन्नईचे पारडे जड असले, तरी यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील लढतीत कोलकाताने चेन्नईला १०३ धावांत रोखून सहज विजय मिळवला होता.

‘त्या’ कारणास्तव कर्णधारपद सोडले : विराट

भारताचे कर्णधारपद सांभाळतानाच बंगळुरूचे कर्णधारपद भूषवणे एका काळानंतर दडपणाचे वाटू लागले. जवळपास ९ वर्षे मी बंगळुरूचा कर्णधार होतो. मात्र चाहत्यांच्या वाढल्या अपेक्षा व फलंदाजीवर झालेला परिणाम या सर्वांचा विचार करता मी कर्णधारपद सोडले, असा खुुलासा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने केला. २०२१च्या हंगामात विराटने बंगळुरूचे कर्णधारपद भूषवले. त्यानंतर २०२२पासून फॅफ डुप्लेसिस या संघाचा कर्णधार झाला. आता २०२५मध्ये रजत पाटिदारकडे बंगळुरूचे नेतृत्व सोपवण्यात आले.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in