
कोलकाता : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी सायंकाळी रंगणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघ आमनेसामने येतील. कोलकातातील ईडन गार्डन्सच्या रणांगणांत होणाऱ्या या सामन्यात चाहत्यांना फिरकीपटूंची जुगलबंदी पाहायला मिळू शकते. मात्र त्यापेक्षाही सर्वाधिक लक्ष हे गतविजेता कोलकाता संघ पंजाबकडून गेल्या लढतीत पत्करलेल्या पराभवाची परतफेड करणार का, याकडे असेल.
मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने ८ पैकी ३ सामने जिंकले असून तूर्तास ते गुणतालिकेत सहा गुणांसह सातव्या स्थानी आहेत. १० दिवसांपूर्वीच मुल्लानपूर येथे झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात पंजाबने कोलकाताला १६ धावांनी पराभूत केले. पंजाबच्या १११ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघ अवघ्या ९५ धावांत गारद झाला. त्यामुळे आता घरच्या मैदानात म्हणजेच ईडनवर खेळताना कोलकाताचा संघ त्या पराभवाची परतफेडी करण्यास आतुर असेल. बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाताला उर्वरित ६ पैकी किमान ५ लढती जिंकणे आवश्यक आहे.
दुसरीकडे मुंबईच्याच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबसाठी यंदाचा हंगाम संमिश्र स्वरुपाचा राहिला आहे. एका लढतीत विजय मिळवल्यानंतर पुढच्याच लढतीत पंजाबने पराभव पत्करल्याचेही दिसून आले आहे. आक्रमक फलंदाजांचा भरणा असला तरी बेजबाबदारपणे फटके खेळल्याचा त्यांना फटका बसला आहे. ८ पैकी ५ सामने जिंकणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. पंजाबला गेल्या सामन्यात बंगळुरूकडून घरच्या मैदानात मुल्लानपूर येथे पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र आत श्रेयस त्याच्या पूर्वीच्या संघाविरुद्ध कोलकातामध्ये छाप पाडण्यास आतुर असेल.
ईडनवर यंदाच्या हंगामात झालेल्या चार सामन्यांपैकी ३ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. मुख्य म्हणजे कोलकाताने स्वत: येथे फक्त एकच लढत जिंकली आहे. त्यामुळे त्यांना घरच्या मैदानात कामगिरी उंचावण्याची गरज आहे. येथे फिरकीपटूंना खेळपट्टीकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. पंजाबकडे युझवेंद्र चहल, ग्लेन मॅक्सवेल व हरप्रीत ब्रार असे, तर कोलकाताकडे सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती व मोईन अली असे फिरकी त्रिकुट आहे. त्यामुळे या फिरकीपटूंची कामगिरी सामन्याचा निकाल ठरवेल, असे अपेक्षित आहे.
रिंकू, रसेलला सूर गवसणार कधी?
कोलकाताच्या यंदाच्या हंगामातील सुमार कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे रिंकू सिंग व आंद्रे रसेल यांचा खराब फॉर्म. रिंकूने आतापर्यंत एकाही सामन्यात ४० धावांचा आकडा गाठलेला नाही, तर रसेल ८ पैकी ५ सामन्यांत १० धावाही करू शकलेला नाही. त्यातच आघाडीच्या फळीचे अपयश कोलकाताला महागात पडत आहे. नरिनकडून अपेक्षित फटकेबाजी झालेली नाही. त्यामुळे रहाणे, रघुवंशी व वेंकटेश अय्यर यांच्यावर कोलकाताची फलंदाजी अवलंबून आहे. गोलंदाजीत हर्षित राणा व वैभव अरोरा वेगवान बाजू सांभाळतील. वरुण व नरिन या फिरकीपटूंना यश न मिळाल्यास मात्र कोलकाता सामने गमावत असल्याचे दिसून आले आहे. मोईन किंवा आनरिख नॉर्किएपैकी एकाला या लढतीत संधी मिळू शकेल.
पूर्वीच्या संघाविरुद्ध श्रेयसची बॅट तळपणार?
गतवर्षी श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने आयपीएल २०२४चे विजेतेपद मिळवले. मात्र अंतर्गत वादामुळे कोलकाताने श्रेयसला संघात कायम राखले नाही. त्यानंतर पंजाबने काही दिवसांपूर्वी कोलकाताला नमवल्यावर श्रेयसने केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता. आता ईडन गार्डन्सवर श्रेयसची बॅट तळपणार का, हे पाहणे रंजक ठरेल. गेल्या तीन सामन्यांत श्रेयसने अनुक्रमे ६, ७, ० अशा धावा केलेल्या आहेत. त्याशिवाय प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या या सलामीवीरांना जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे. मार्कस स्टोइनिस, मॅक्सवेल व जोश इंग्लिस या ऑस्ट्रेलियन त्रिकुटालाही फारशी छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीत अर्शदीप सिंग व चहल यांच्यावर पंजाबची भिस्त आहे. मार्को यान्सेनही कमाल करत आहे. सांघिक कामगिरी जुळून आल्यास पंजाबचा संघ कोलकातावर वर्चस्व गाजवू शकतो.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३४ सामन्यांपैकी कोलकाताने २१, तर पंजाबने १३ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार कोलकाताचे पारडे जड असले, तरी पंजाब यंदाच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा कोलकाताला धूळ चारण्यास उत्सुक असेल. त्यामुळे चाहत्यांना दर्जेदार लढत पाहायला मिळेल.
कोलकाताच्या खेळपट्टीकडेही लक्ष
कोलकाताच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. कोलकाता संघाला अपेक्षित किंवा फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी मिळत नसल्याने संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे व मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी नाराजी व्यक्त केली होती. समालोचना दरम्यानही हा मुद्दा उचलण्यात आल्यावर बंगाल क्रिकेट असोसिएशनने काही समालोचकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. कोलकाताच्या पिच क्युरेटरची प्रतिक्रियाही काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे आता शनिवारी खेळपट्टी कशी असेल, हे पाहणे रंजक ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप