
कोलकाता : आयपीएलमध्ये गुरुवारी रंगणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी ३ पैकी १ लढत जिंकली असून दोघांनाही गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या लढतीमध्ये विजयपथावर परतण्याचे दोघांपुढे आव्हान असेल.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाताने बंगळुरूकडून पराभव पत्करल्यानंतर राजस्थानला धूळ चारली. मात्र गेल्या सामन्यात त्यांना मुंबईने पराभूत केले. त्यामुळे तूर्तास हा संघ गुणतालिकेत तळाच्या १०व्या स्थानी आहे. सुनील नरिन आणि आंद्रे रसेल या अनुभवी वेस्ट इंडियन खेळाडूंचे अपयश कोलकाताला महागात पडत आहे. त्याशिवाय वेंकटेश अय्यरनेही लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. क्विंटन डीकॉक, अंक्रिश रघुवंशी व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनीच आतापर्यंत चमक दाखवली आहे.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादने हंगामाची सुरुवात धडाक्यात केली होती. राजस्थानविरुद्ध २८६ धावा केल्यानंतर या संघाला गेल्या दोन सामन्यांत २०० धावांचा पल्लाही गाठता आला नाही. लखनऊ व दिल्लीकडून हैदराबादने सलग दोन पराभव पत्करले. ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा असे धडाकेबाज फलंदाज हैदराबादकडे आहेत. त्याशिवाय अनिकेत वर्मानेही छाप पाडली आहे. गोलंदाजीत या संघाला मेहनत घेण्याची गरज आहे.
कोलकाताच्या खेळपट्टीवर दव येणे अपेक्षित असून येथे फिरकीपटूंना सहाय्य लाभते. त्यामुळे कोलकाताचे फिरकीपटू आणि हैदराबादचे फलंदाज यांच्यातील द्वंद्व रंगतदार होईल.