IPL 2025 : कोलकाता-राजस्थान आमनेसामने; फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य

IPL 2025 : कोलकाता-राजस्थान आमनेसामने; फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य

गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.
Published on

गुवाहाटी : गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. बुधवारी हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पहिल्या लढतीतील चुकांमधून धडा घेऊन सुधारणा करण्याचा मानस दोन्ही संघांचा असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या हंगामातील सलामीच्या लढतीत कोलकाताला ७ विकेटने पराभूत केले. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ४४ धावांनी धूळ चारली. केकेआर आणि राजस्थान या दोन्ही संघांत तगडे फलंदाज आहेत. मात्र पहिल्या लढतीत दोन्ही संघांतील फलंदाजांनी निराश केले. सुनील नरिन वगळता कोलकाताचे अन्य गोलंदाज आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले. पहिल्या सामन्यात वरुण चक्रवर्ती महागडा ठरला. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर काही ग्रिप होत्या. मात्र फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली. गुवाहटीची खेळपट्टी फिरकीसाठी फायदेशीर असते. तेथे आपले फिरकीपटू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा केकेआरला आहे. कोलकाताचे लक्ष असेल. पाठीच्या दुखापतीतून तो सावरत आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू दुखापतीतून सावरला तर स्पेन्सर जॉन्सनच्या जागी त्याला संधी मिळेल.

अजिंक्य रहाणे आणि नरिन यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही कोलकाताची मधली फळी ढेपाळली. क्रॉस बॅटने फटका मारताना वेंकटेश अय्यर आणि आंद्रे रसेल हे बाद झाले. गुवाहाटी येथे आपल्या खेळात सुधारणा करण्याची अपेक्षा कोलकाताला असेल. रिंकू सिंहच्या बॅटमधून मोठे फटके निघतील अशी अपेक्षा कोलकाताला आहे. मोठी धावसंख्या उभारण्यासाठी केकेआरला रिंकूच्या फॉर्मची आवश्यकता आहे. रिंकूचा अलिकडील टी-२० फॉर्म निराशाजनक आहे. अखेरच्या ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने ११, ९, ८, ३०, ९ अशी खेळी खेळली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याला केवळ १२ धावा जमवता आल्या. रिंकू आणि अन्य प्रमुख फलंदाजांनी धावा जमवणे केकेआरसाठी गरजेचे आहे.

राजस्थान रॉयल्सचा जोफ्रा आर्चर सनराजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात महागडा ठरला होता. त्याने ४ षटकांत ७६ धावा मोजल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशनच्या हल्ल्यापुढे राजस्थानचे गोलंदाज गोंधळले होते. पहिल्या सामन्यातील पराभव विसरून गुवाहाटी येथे चांगली कामगिरी करण्याची संधी संघाकडे आहे. रियान पराग या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानच्या संघाला चांगल्या खेळाची आशा आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in