
कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ मंगळवारी दुपारी ईडन गार्डन्सवर आमनेसामने येणार आहेत. या सामन्याच्या निमित्ताने सुनील नरिन आणि त्याचा मोठा चाहता असलेल्या दिग्वेश राठी यांच्यातील मैदानातील लढाई पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. आपल्या गत सामन्यांत दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ही विजयी मालिका कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
दोन सामन्यांतील विजयामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. घरच्या मैदानावर कोलकाताला संमिश्र यश मिळालेले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर कोलकाताने सनरायजर्स हैदराबादवर मोठा विजय मिळवला. या सामन्यात केकेआरच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यरने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. रिंकू सिंह आणि अनुभवी अजिंक्य रहाणे यांनीही चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात हातभार लावला. स्पर्धेत युवा खेळाडू अग्निहोत्री रघुवंशीने आपल्या खेळाने लक्ष वेधून घेतले. सलामीच्या जोडीचे अपयश हे नाईट रायडर्ससाठी अडचण ठरत आहे.
क्विंटन डी कॉक आणि सुनील नरिन हे अनुभवी सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करून देण्यासाठी संघर्ष करत आहेत. यंदाच्या हंगामातील त्यांची सर्वोच्च भागीदारी ही ४४ धावांची आहे. त्याव्यतिरिक्त या जोडीने ४,१ आणि १४ धावांची भागीदारी केली आहे. फलंदाज म्हणून नरिन हा स्वत:ला सिद्ध करण्यात आतापर्यंत तरी अपयशी ठरला आहे. त्यामुळे जर का डी कॉक सोबत रघुवंशीला सलामीला संधी दिल्यास आश्चर्य वाटायला नको.
नरिन विरुद्ध राठी
नरिन आणि राठी हे दोन खेळाडू या सामन्यानिमित्त आमनेसामने आले आहेत. गुरू आणि शिष्य यांच्यात कोणता खेळाडू उजवा ठरतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. सुनील नरिनला पाहून मी गोलंदाजीच्या प्रेमात पडल्याचे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सामनावीराचे पारितोषिक जिंकल्यानंतर राठी म्हणाला. शांत राहणे, फलंदाजांवर आक्रमण करणे आणि अटीतटीच्या वेळेप्रसंगी निर्भिड राहणे या नरिनमधल्या गोष्टी मला आवडतात, असे राठी म्हणाला. इम्रान ताहीरसारखी हेअरस्टाईल, नरिनसारखी गोलंदाजी शैली यांचा संगम असलेल्या राठीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लक्षवेधक कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात लखनऊचे अन्य गोलंदाज महागडे ठरले होते. मात्र राठीची गोलंदाजी संघासाठी फायदेशीर ठरली. त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा देत १ विकेट मिळवली. हंगामातील चार सामन्यांत ६ विकेट आणि ७.६२ च्या सरासरीने धावा देत राठीने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप