श्रीमंत ऋषभ पंत! सर्वाधिक २७ कोटींची बोली, अय्यर दुकलीसाठीही संघमालकांनी मोजले कोटी रुपये

IPL 2025 Mega Auction Day 1: भारताचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्स संघाने पंतला विक्रमी २७ कोटी रुपयांत खरेदी केले. त्याशिवाय श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) आणि वेंकटेश अय्यर (२३.७५) यांच्यावर अनुक्रमे पंजाब किंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स संघाने दमदार बोली लावली.
श्रीमंत ऋषभ पंत! सर्वाधिक २७ कोटींची बोली, अय्यर दुकलीसाठीही संघमालकांनी मोजले कोटी रुपये
Published on

जेद्दा : भारताचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्स संघाने पंतला विक्रमी २७ कोटी रुपयांत खरेदी केले. त्याशिवाय श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) आणि वेंकटेश अय्यर (२३.७५) यांच्यावर अनुक्रमे पंजाब किंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स संघाने दमदार बोली लावली. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले.

पुढील वर्षी मार्च ते मे महिन्यात आयपीएलचा १८वा हंगाम खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा सौदी अरेबिया येथे दोन दिवसांचे मेगा ऑक्शन आयोजित करण्यात आले होते. पंत, अय्यर, के. एल. राहुल असे आघाडीचे खेळाडू यंदा लिलावाच्या रिंगणात असल्याने त्यांच्यासाठी संघमालक तुटून पडतील, याची सर्वांना कल्पना होती. त्यातच २०२२मध्ये अपघात झाल्यावर पंत जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. मात्र २०२४मध्ये त्याने झोकात पुनरागमन केले. त्यामुळे पंतसाठी संघमालक कोटींची उड्डाणे घेणार, हे निश्चित होते.

दरम्यान, गत‌वर्षी कोलकाताने मिचेल स्टार्कला २४ कोटींमध्ये विकत घेतले होते. श्रेयसने कोलकाताचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. मात्र त्याला संघात कायम राखण्यात आले नाही. अखेरीस पहिल्याच सेटमध्ये श्रेयसला प्रथम पंजाबने २६.७५ कोटींमध्ये खरेदी केले. मात्र श्रेयसचा हा विक्रम काही मिनिटांसाठीच राहिला. याच सेटमधील अखेरचा खेळाडू असलेल्या पंतवर लखनऊने २१ कोटींपर्यंत बोली लावली. त्यावेळी अन्य कोणीही आव्हान न दिल्याने मल्लिका सागर (लिलावकर्ती) हिने दिल्लीस पंतसाठी ‘राइट टू मॅच’ कार्ड वापरायचे आहे का, हे विचारले. दिल्लीने होकार दिल्यावर लखनऊने थेट २७ कोटींवर पंतची किंमती नेली. मग दिल्लीने नकार दर्शवला व पंत लखनऊचा भाग झाला.

तसेच अष्टपैलू वेंकटेशसाठी कोलकाताने अनपेक्षितपणे २३ कोटींपर्यंत बोली लावली. त्याला रिटेन करण्यात आले नव्हते. मात्र तरीही कोलकाता त्याच्या मागे धावली. राजस्थान व मुंबईने या लिलावात पहिल्या २ तासांत एकाही खेळाडूला खरेदी केले नाही. त्यानंतर मात्र दोन्ही संघांनी दमदार खरेदी केली. चेन्नईने डेवॉन कॉन्वे, रचिन रवींद्र या खेळाडूंना संघात सामील केले.

आतापर्यंत झालेल्या लिलावामध्ये भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व दिसून आले. आता सोमवारीही लिलाव होणार असून बोली न लागलेल्या खेळाडूंना आणखी एक संधी मिळणार आहे.

बोल्ट पुन्हा मुंबईत; नमन, मिन्झवरही बोली

२०२०च्या हंगामात मुंबईला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ट्रेंट बोल्टला मुंबईने १२.५ कोटी रुपयांत खरेदी केले. त्यामुळे बोल्ट आणि जसप्रीत बुमरा या जोडीची वानखेडेवरील कमाल पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मुंबईने लिलावापूर्वीच बुमरासह रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांना रिटेन केले होते. त्यानंतर मुंबईने नमन धीरसाठी ‘राइट टू मॅच’ वापरले. तसेच यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन मिन्झला ३० लाखांत खरेदी केले. मुंबईने जोफ्रा आर्चरसाठी सुद्धा ११ कोटींपर्यंत बोली लावली होती. मात्र आर्चर राजस्थानच्या ताफ्यात गेला. त्यानंतर मुंबईने बोल्टला खरेदी केले.

logo
marathi.freepressjournal.in