IPL 2025 - MI vs CSK : रोहितला सूर गवसला; चेन्नईचा हंगाम संपला?

वानखेडे स्टेडियमवर रविवारी रात्री झालेल्या आयपीएल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूंत नाबाद ७६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
IPL 2025 - MI vs CSK : रोहितला सूर गवसला; चेन्नईचा हंगाम संपला?
Published on

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर रविवारी रात्री झालेल्या आयपीएल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने ४५ चेंडूंत नाबाद ७६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याला सूर्यकुमार यादवच्या ३० चेंडूंतील घणाघाती नाबाद ६८ धावांच्या खेळीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जवर ९ गडी आणि २६ चेंडू राखून वर्चस्व गाजवले. आठ सामन्यांतील सहाव्या पराभवामुळे चेन्नईचे मात्र स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले, अशीच चर्चा सगळीकडे सुरू आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळताना चेन्नईने फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर २० षटकांत ५ बाद १७६ धावा केल्या. मुंबईकर आयुष म्हात्रे (३२) याची फटकेबाजी व शिवम दुबे, रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकानंतरही चेन्नईला १९० ते २०० धावा करता आल्या नाहीत. येथेच सामना त्यांच्या हातून काहीसा निसटला. त्यानंतर मग धावांचा पाठलाग करताना रोहितला सूर गवसला. यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावताना रोहितने ४ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. तसेच सूर्यकुमारने ६ चौकार व ५ षटकारांसह आणखी एक अर्धशतक साकारले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईने २०२२ नंतर प्रथमच चेन्नईविरुद्ध विजय मिळवला. मुंबईचा हा आठ सामन्यांतील चौथा विजय ठरला. त्यामुळे ते बाद फेरीच्या शर्यतीत टिकून आहेत.

logo
marathi.freepressjournal.in