IPL 2025 - MI vs KKR : मुंबईचा पहिला विजय

डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने पदार्पणातच छाप पाडताना ४ बळी मिळवले. त्यामुळे मुंबई इंडियन्सने सोमवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला ८ विकेट आणि ४३ चेंडू राखून पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला.
IPL 2025 - MI vs KKR : मुंबईचा पहिला विजय
Published on

मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने पदार्पणातच छाप पाडताना ४ बळी मिळवले. त्यामुळे मुंबई इंडियन्सने सोमवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला ८ विकेट आणि ४३ चेंडू राखून पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. मुंबईने १६.२ षटकांत कोलकाताला ११६ धावांत गुंडाळले. २३ वर्षीय अश्वनीने कर्णधार अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल असे महत्त्वाचे चार गडी टिपले. अंक्रिश रघुवंशीने कोलकाता कडून सर्वाधिक २६ धावा केल्या. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मुंबईने १२.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रिकल्टनने नाबाद ६२ धावा जमवत मुंबईच्या विजयात हातभार लावला. त्याला सूर्यकुमारने नाबाद २७ धावांची साथ दिली. मुंबईने हा सामना सहज जिंकत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.

उबरकडून क्रीडाप्रेमींना मोफत सेवा

मुंबईच्या वानखेडेवरील आयपीएल सामन्यांसाठी उबरकडून मोफत राइड सेवा पुरवण्यात येणार आहे. असंख्य चाहत्यांना आपल्या तिकीटवर नमूद केलेल्या गेटपर्यंत पोहोचण्यासाठी गर्दी आणि ट्राफिकमधून मार्ग काढावा लागतो. त्यांना या उबर राइड सेवेचा लाभ घेता येईल. बीकेसी, वरळी नाका (फिनिक्स मॉल) यांसारख्या काही जागांवरून चाहत्यांना उबरची बस पकडता येईल. त्याशिवाय सामना संपल्यानंतर ही बस तुम्हाला पुन्हा त्याच स्थळीसुद्धा सोडणार आहे. हे सर्व उबरकडून मोफत करण्यात येणार असून चाहत्यांना यासाठी फक्त उबर ॲपमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. एकूणच उबरच्या या उपक्रमामुळे असंख्य चाहत्यांना लाभ होणार आहे.

षटकांच्या संथ गतीसाठी परागला दंड

चेन्नईविरुद्धच्या लढतीत षटकांची गती संथ राखल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. राजस्थानने निर्धारित वेळेत २०वे षटक सुरू केले नाही. नव्या नियमानुसार तीन वेळा षटकांची गती संथ राखूनही कर्णधारावर बंदी टाकण्यात येणार नाही. मात्र त्याला डिमेरीट गुण देण्यात येतील. तसेच दंडाची रक्कम वाढत जाईल.

धोनी १० षटके फलंदाजी करू शकत नाही!

महेंद्रसिंह धोनीच्या गुडघ्यावर २०२४मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. सध्या तो संघासाठी यष्टिरक्षण करत असून फलंदाजीतही अखेरच्या षटकांत हाणामारी करत आहे. मात्र त्याला चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवणे जोखमीचे ठरू शकते. तो १०-१२ षटके पूर्ण ताकदीने फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे शेवटच्या ३-४ षटकांत किंवा ६ ते ७ विकेट गेल्यावर धोनी फलंदाजीस येत आहे, असा खुलासा चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी केला. त्याशिवाय चेन्नईचा संघ लवकरच विजयपथावर परतेल, असे ते म्हणाले.

रात्री २ वाजेपर्यंत कोस्टल रोड खुला

मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांसाठी कोस्टल रोड रात्री २ वाजेपर्यंत खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वानखेडेवर मुंबईचे ७ सामने होणार आहेत. साधारणपणे ११ ते ११.३०च्या दरम्यान आयपीएलची लढत संपते. मात्र कोस्टल रोड ११ वाजता बंद होत असल्याने अनेक नागरिकांचे घरी परतताना हाल होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर शासनाशी संवाद साधून कोस्टल रोड रात्री २ वाजेपर्यंत खुला ठेवण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in