
मुंबई : सध्या चांगलाच लयीत असलेला मुंबई इंडियन्सचा संघ धोकादायक मानल्या जाणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध रविवारी भिडताना आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. सलग चार सामन्यांत विजय मिळवल्यानंतर मुंबईचा संघ सलग पाचव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी मुंबई आणि लखनऊत चढाओढ सुरू आहे.
शुक्रवारी झालेल्या सामन्यांपर्यंत मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ प्रत्येकी १० अशा समसमान गुणांसह गुणतालिकेत अनुक्रमे चौथ्या आणि सहाव्या स्थानी आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण ९ सामन्यांपैकी त्यांनी प्रत्येकी ५ सामने जिंकले असून ४ सामने गमावले आहेत.
वानखेडे स्टेडियममधील वर्चस्वासाठी या दोन संघांमध्ये लढत असेल. मुंबईतील उकाडाही खेळाडूंची परीक्षा घेणार असेल. कर्णधार रिषभ पंतच्या बॅटमधून मोठ्या धावांची अपेक्षा संघाला आहे. मुंबईच्या संघाने सलग ४ सामन्यांत विजय मिळवला आहे. अशातच वानखेडेच्या मैदानावर मुंबईच्या संघाला पराभूत करणे लखनऊसाठी सोपे नसेल.
रोहित, सूर्या, बोल्ट, पंड्या, बुमरावर नजरा
मुंबईने योग्य वेळी आपल्या खेळात सुधारणा केली आहे. त्यांचे तगडे खेळाडू लयीत आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या ही चौकडी मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. प्रतिस्पर्धी संघाला धक्का देण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. रोहितने चेन्नई आणि हैदराबादविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली आहेत. सूर्यकुमार यादव, तिलक वर्माही चमकदार कामगिरी करत आहेत. हार्दिक पंड्या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहे. अचूक गोलंदाजीसह तो आक्रमक फलंदाजी करत आहे. दीपक चहर आणि ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा उपयुक्त गोलंदाजी करत आहेत.
कठीण काळात अनुभवी खेळाडूंना पाठिंबा द्या - पोलार्ड
कठीण काळात अनुभवी खेळाडूंना पाठिंबा द्या, असे मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड म्हणाले. मैदान आणि मैदानाबाहेरही रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी अडचणीविरोधात लढा दिला. त्यामुळे पोलार्ड यांनी त्यांचे कौतुक केले. रोहित शर्मा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. पंड्याने कर्णधारपद घेतल्यानंतर त्याला चाहत्यांकडून टीका सहन करावी लागली, त्याचवेळी तो वैयक्तिक अडचणींना देखील सामोरा जात होता, असे पोलार्ड म्हणाले.
पंतला सूर गवसणार?
हंगामात आतापर्यंत रिषभ पंतने ९ सामन्यांत केवळ १०६ धावा जमवल्या आहेत. भारताच्या या यष्टीरक्षक-फलंदाजाला हंगामात चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र संघातील अन्य खेळाडू जबाबदारीने खेळत आहेत. अशातच पंतच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा आहेत.
मुंबईची खराब कामगिरी
आयपीएलमध्ये लखनऊ आणि मुंबई हे संघ ७ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील ६ सामन्यांत लखनऊने विजय मिळवला असून मुंबईने केवळ एका सामन्यात बाजी मारली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप