
लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी रंगणाऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सची मुंबई इंडियन्सशी गाठ पडणार आहे. या लढतीत प्रामुख्याने मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा आणि लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल. दोघांचीही बॅट गेल्या काही काळापासून थंडावलेली असल्याने कोणता खेळाडू लवकर लय मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने ३ पैकी फक्त एक लढत जिंकली आहे. चेन्नई आणि गुजरातकडून पराभव पत्करल्यानंतर मुंबईने घरच्या मैदानात कोलकाताला सहज धूळ चारून गुणांचे खाते उघडले. मात्र आता पाच वेळचा विजेता मुंबई संघ पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात खेळणार आहे. त्यातच लखनऊविरुद्ध मुंबईने आतापर्यंत ६ पैकी ५ लढती गमावल्या असून त्यांना इकाना स्टेडियमवरील यापूर्वीच्या दोन्ही लढतींमध्येही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यंदा मुंबई येथील पराभवाची मालिका संपुष्टात आणेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईला विजयपथावर टिकून राहण्यासाठी रोहितला सूर गवसणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांत रोहितने अनुक्रमे ०, ८, १३ अशा एकूण २१ धावाच केल्या आहेत. एकाही लढतीत रोहित पॉवरप्लेच्या पुढे फलंदाजी करू शकलेला नाही. त्याचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मुंबईचा संघ वापर करत आहे. त्यामुळे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच आयपीएलमध्येही जबाबदारी घेत आक्रमक सुरुवात करावी, अशी चाहत्यांना आशा आहे. गतवर्षी लखनऊविरुद्धच रोहितने आयपीएलमधील अखेरचे अर्धशतक साकारले होते.
दुसरीकडे पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊनेसुद्धा ३ पैकी १ सामना जिंकला आहे. गेल्या लढतीत लखनऊला घरच्या मैदानातच पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीनंतर खेळपट्टीवरून वादविवाद झाले. त्यामुळे आता या लढतीसाठी फिरकीपटूंना पोषक म्हणजेच काळ्या मातीची खेळपट्टी वापरण्यात येईल, असे अपेक्षित आहे. मात्र लखनऊला मुख्य चिंता असेल ती पंतच्या फॉर्मची. पंतने ३ सामन्यांत अनुक्रमे ०, १५, २ अशा फक्त १७ धावा केल्या आहेत. लखनऊमध्ये दव फारसे येत नसल्याने येथे प्रथम फलंदाजी केल्यास १८० धावाही आव्हानात्मक ठरू शकतात.
गोलंदाजी मुंबईची ताकद
कोलकाता संघाला ११६ धावांत गुंडाळल्यामुळे मुंबईच्या गोलंदाजी चमूचा आत्मविश्वास उंचावला आहे. ट्रेंट बोल्ट व दीपक चहर या वेगवान जोडीसह पदार्पणातच छाप पाडणारा डावखुरा अश्वनी कुमार व हार्दिक यांचे पर्यायही मुंबईकडे आहेत. तसेच या लढतीत फिरकीपटूला सहाय्यक खेळपट्टी असल्यास विघ्नेश पुथूर व मिचेल सँटनर प्रभावी ठरू शकतात. विल जॅक्सऐवजी मुजीब उर रहमानला खेळवण्याचा पर्यायही मुंबईपुढे आहे. फलंदाजीत मात्र रायन रिकल्टन व सूर्यकुमार यादव यांच्यावर मुंबई अवलंबून आहे. तिलक वर्मा, हार्दिक व रोहित यांच्याकडूनही आता योगदान अपेक्षित आहे.
पूरन आणि फिरकीपटूंवर लखनऊची भिस्त
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला निकोलस पूरन (१८९ धावा) आणि मिचेल मार्श (१२४) यांच्यावर लखनऊची फलंदाजी अवलंबून आहे. एडीन मार्करम, पंत व डेव्हिड मिलर यांना अद्याप छाप पाडता आलेली नाही. अब्दुल समद व आयुष बदोनी अपेक्षित फटकेबाजी करू शकतात. गोलंदाजीत रवी बिश्नोई, दिग्वेश राठी व एम. सिद्धार्थ यांचे फिरकी त्रिकुट मोलाचे ठरेल. तसेच आकाश दीपही तंदुरुस्त होऊन संघात परतल्याने त्याच्यासह शार्दूल ठाकूर किंवा आवेश खान वेगवान माऱ्याची धुरा वाहील.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ६ आयपीएल सामन्यांपैकी लखनऊने ५, तर मुंबईने फक्त १ लढत जिंकली आहे. २०२४मध्ये लखनऊने मुंबईला दोन्ही लढतींमध्ये धूळ चारली होती. त्यामुळे आकडेवारी लखनऊच्या बाजूने असून मुंबई यावेळी पलटवार करण्यास उत्सुक असेल.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप