MI vs PBKS: मुंबईला अग्रस्थान पटकावण्याची संधी; पंजाबविरुद्ध आज निर्णायक लढत; जिंकणारा संघ ‘क्वालिफायर-१’साठी ठरणार पात्र

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी रंगणाऱ्या निर्णायक लढतीत मुंबई इंडियन्सची पंजाब किंग्जशी गाठ पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास मुंबईला गुणतालिकेत अग्रस्थान काबिज करण्यासह अव्वल दोन संघांत स्थान पक्के करण्याचीही सुवर्णसंधी आहे.
MI vs PBKS: मुंबईला अग्रस्थान पटकावण्याची संधी; पंजाबविरुद्ध आज निर्णायक लढत; जिंकणारा संघ ‘क्वालिफायर-१’साठी ठरणार पात्र
संग्रहित छायाचित्र
Published on

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी रंगणाऱ्या निर्णायक लढतीत मुंबई इंडियन्सची पंजाब किंग्जशी गाठ पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास मुंबईला गुणतालिकेत अग्रस्थान काबिज करण्यासह अव्वल दोन संघांत स्थान पक्के करण्याचीही सुवर्णसंधी आहे. त्यामुळेच मुंबई-पंजाबपैकी सर्वात प्रथम ‘क्वालिफायर-१’चा मान कुणाला मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने १३ पैकी ८ लढती जिंकल्या असून १६ गुणांसह त्यांनी बाद फेरीतील (प्ले-ऑफ) स्थान पक्के केले आहे. मात्र गुजरातचा (१८ गुण) निर्णायक क्षणी दोन लढतींमध्ये पराभव झाल्याने मुंबईला आता अग्रस्थान खुणावत आहे. सोमवारी मुंबईने पंजाबला नमवले, तर ते अग्रस्थानी झेप घेतील. कारण मुंबईचे अशा स्थितीत १८ गुण होतील. मुंबईची धावगती (नेट रनरेट) स्पर्धेतील अन्य संघांच्या तुलनेतही सर्वोत्तम आहे. त्यामुळे आता जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई कमाल करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

मुख्य म्हणजे साखळीतील पहिल्या पाचपैकी मुंबईने फक्त एक लढत जिंकली होती. त्यानंतर सलग विजयांचा षटकार लगावून मुंबईने झोकात पुनरागमन केले. गुजरातने मुंबईचा विजयरथ रोखला. मात्र २१ मे रोजी वानखेडेवर मुंबईने दिल्लीला नमवून पुन्हा विजयी लय मिळवली, तसेच बाद फेरीतील प्रवेश पक्का केला. पाच वेळचा विजेता मुंबईचा संघ दडपणात कामगिरी उंचावण्यात पटाईत आहे. त्यामुळे ते पंजाबविरुद्धही चमक दाखवतील, अशी आशा आहे.

दुसरीकडे मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबलाही सोमवारी अग्रस्थान पटकावण्याची संधी आहे. पंजाबचे सध्या १३ सामन्यांत ८ विजय व एक रद्द लढत असे एकूण १७ गुण आहेत. त्यांचीही धावगती गुजरातपेक्षा वर आहे. त्यामुळे पंजाबही मुंबईला नमवून अग्रस्थान पक्के करण्यास उत्सुक असेल. तसेच गेल्या दोन्ही लढती पंजाबचा संघ जयपूरमध्येच खेळला असल्याने, याचा त्यांना लाभ होऊ शकतो.

दरम्यान, जयपूरमध्ये यंदाच्या हंगामात मुंबईने राजस्थानविरुद्ध खेळलेल्या लढतीत २१७ धावा करून १०० धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. पंजाबनेसुद्धा येथे २ सामने खेळले असून त्यांपैकी एक लढत जिंकली. तर गेल्या लढतीत त्यांना दिल्लीविरुद्ध २०७ धावा करूनही पराभव पत्करावा लागला. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असून मधल्या षटकांत फिरकीपटूंना सहाय्य लाभते. सोमवारी कोणती खेळपट्टी वापरण्यात येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मंगळवारी बंगळुरू-लखनऊ यांच्यात अखेरचा साखळी सामना असेल, त्यामुळे मुंबई-पंजाब लढतीच्या निकालावर बंगळुरूचेही आवर्जून लक्ष असेल. एकूणच सोमवारी रंगतदार लढत तमाम क्रीडारसिकांना अपेक्षित आहे.

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांपैकी मुंबईने १७, तर पंजाबने १५ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांत अटीतटीची झुंज असल्याचे स्पष्ट होते. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत, त्यामुळे या जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनुभवी चौकडीवर मुंबईची भिस्त

मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा व ट्रेंट बोल्ट असे चार अनुभवी खेळाडू आहेत. विशेषत: सूर्या यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करत असून त्यानेच मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. रायन रिकल्टन, विल जॅक्स यांच्यासाठी हा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना असेल. त्यामुळे पर्यायी खेळाडूंनाही मुंबई संधी देऊ शकते. तिलक वर्मा सातत्याने संघर्ष करत आहे, तर नमन धीर मात्र दडपणाखाली फटकेबाजी करत आहे. गोलंदाजी मुंबईची जमेची बाजू असून त्यांच्याविरुद्ध १८० ते २०० धावा करणे सोपे नसेल. बोल्ट व बुमरा यांना रोखण्यासह पंजाबला डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दीपक चहर व हार्दिक यांच्याकडून गोलंदाजीत सुधारणा अपेक्षित आहे.

फलंदाजांवर पंजाबची मदार; चहलबाबत संभ्रम

पंजाबची मदार प्रामुख्याने त्यांच्या फलंदाजांवर आहे. प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्य या सलामीवीरांपैकी एकानेही ४५ धावांचा पल्ला पार केल्यास, पंजाबने यंदा एकही लढत गमावलेली नाही. तसेच कर्णधार श्रेयस उत्तम लयीत आहे. शशांक सिंग व नेहल वधेरा हे दोन्ही खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचे रूप पालटू शकतात. गोलंदाजीत मात्र पंजाबचा चिंता सतावत आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहल मनगटाच्या दुखापतीमुळे या लढतीसही मुकण्याची शक्यता आहे. तसेच पंजाबविरुद्ध यंदाच्या हंगामात प्रतिस्पर्धी संघांनी २०० धावांचा पाठलाग सहज केला आहे. अशा स्थितीत पंजाबच्या गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश, रघू शर्मा, जॉनी बेअरस्टो, रिचर्ड ग्लीसन, चरिथ असलंका.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल, मिचेल ओव्हन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता, थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in