
क्रीडा प्रतिनिधी/मुंबई
चंदीगडचा २३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने सोमवारी आयपीएल पदार्पणातच सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई इंडियन्सकडून पहिली लढत खेळताना अश्वनीने ३ षटकांत २४ धावांतच ४ बळी मिळवले. अश्वनीमुळे आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयाची बोहनी झाली. तेव्हापासून सगळीकडे सध्या अश्वनीचीच चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या पदार्पणातच ४ बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत अश्वनीने वैयक्तिक पहिल्याच चेंडूवर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. त्यानंतर मनीष पांडे व आंद्रे रसेल यांचा त्याने अफलातून त्रिफळा उडवला. त्याचा वेग १४१पर्यंत पोहोचत होता. रिंकू सिंगचाही अडसर अश्वनीनेच दूर करून कोलकाताला ११६ धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर मुंबईने १२.५ षटकांत हे लक्ष्य गाठून तिसऱ्या सामन्यात पहिला विजय नोंदवला. अश्वनीलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
खरे तर अश्वनी हा गतवर्षी पंजाब संघासह नेट बॉलर म्हणून होता. मात्र मुख्य संघात त्याला एकदाही स्थान लाभले नाही. यंदा लिलावात मुंबईने ३० लाख रुपयांत अश्वनीला खरेदी केले. यापूर्वीच्या दोन सामन्यांत सत्यनारायण राजू अपयशी ठरल्याने वानखेडेवरील पहिल्या लढतीत अश्वनीला संधी देण्यात आली. अश्वनीने याचा लाभ घेत छाप पाडली. मोहाली येथील झंजेरी गावातील अश्वनीने १८व्या वर्षी स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र दुखापतीमुळे मध्यंतरी तो क्रिकेटपासून दूर होता.
“सामन्यापूर्वी मी नक्कीच चिंतेत होतो. दुपारच्या जेवणात मी फक्त एक केळं खाल्ले. कदाचित मी अतिरिक्त दडपण घेत विचार करत होतो. मात्र सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिकसह संघातील वरिष्ठ खेळाडूंनी माझ्याशी संवाद साधला. याचा मला लाभ झाला. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाल्याने माझा आत्मविश्वास उंचावला,” असे अश्वनी म्हणाला.
“तू पंजाबचा आहेस. पंजाबची माणसे परिस्थितीला घाबरत नाहीत, तर त्यांना पाहून विरोधी घाबरतात. त्यामुळे तुझा सर्वोत्तम खेळ कर,” असे हार्दिकने आपल्याला सांगितल्याचेही अश्वनी म्हणाला.
१२ वर्षांनी प्रथमच एका भारतीय गोलंदाजाने आयपीएलमधील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली. अश्वनीपूर्वी २०१३मध्ये हनुमा विहारीने कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलचा बळी मिळवला होता.
स्काऊट चमूला श्रेय देणे गरजेचे: हार्दिक
अश्वनी, विघ्नेश पुथूर यांसारख्या खेळाडूंना देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधून आणण्याचे श्रेय मुंबईच्या स्काऊट चमूला (खेळाडूंचा शोध घेणारे) जाते. ते आयपीएलच्या लिलावापूर्वीच २-३ महिन्यांपासून विविध स्थानिक स्पर्धांवर लक्ष ठेवून असतात. अश्वनीने डीकॉकचा घेतलेला झेलही उत्तम होता. गोलंदाजीत मग त्याने सामना पूर्णपणे आमच्या बाजूने झुकवला, अशा शब्दांत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने अश्वनीचे कौतुक केले.