
अहमदाबाद : सध्या चांगल्याच लयीत असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जची कसोटी लागणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील क्वालिफायर - २ म्हणजेच उपांत्य फेरीच्या लढतीत रविवारी हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचे तिकिट मिळणार आहे. क्वालिफायर - १ च्या लढतीत रॉयल चलेंजर्स बंगळुरू विरुद्ध ८ विकेट्सने एकतर्फी एकतर्फी पराभव झाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जचा आत्मविश्वास ढासळला आहे. करो या मरो अशा या सामन्यात विजय मिळवून पहिल्यावहिल्या आयपीएल विजेतेपदाला गवसणी घालण्याचे पंजाबचे लक्ष्य असेल.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने कूच करत आहे. त्यांनी एलिमिनेटर लढतीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या गुजरात टायटन्सला पराभूत केले.
नॉक आऊट सामन्यांतील मुंबईचा अनुभव स्पर्धेतील उर्वरित दोन संघांच्या तुलनेत चांगला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडे तगडा संघ म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या हंगामात गुणतालिकेत तळात राहिल्यानंतर मुख्य प्रशिक्षक महेला जयावर्धने यांनी यंदाच्या हंगामात मुंबईची उत्तम संघबांधणी केली आहे. त्यामुळे संघाने यंदा कामगिरी उंचावली आहे. दुसरीकडे या आधीच्या लढतीतील पराभव विसरून रविवारच्या सामन्यात खेळ उंचावण्याचा प्रयत्न अय्यर रिकी पाँटींग जोडीचा असेल. अर्शदीप सिंगसह गोंलदाजीत त्यांच्या संघावर दबाव असेल.
मार्को यान्सेन आणि युजवेंद्र चहल यांच्या अनुपस्थितीत मुल्लनपूर येथे पंजाबला बंगळुरूवर दबाव टाकता आला नाही. पंजाबसाठी हा खराब दिवस होता. त्यांच्या फलंदाजांनीही निराश केले. नॉक आऊट लढतीत पंजाबचा संघ कच खातो हा आजवरचा इतिहास आहे. परंतु यंदा त्यांना ही संधी गमावायची नसेल.
गुजरातच्या गोलंदाजांवर रोहित शर्माने कशा पद्धतीने आक्रमण केले आणि मुंबईने हा सामना कसा खिशात घालता याची जाणीव पंजाबला आहे.
मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या भारतीय संघातील खेळाडूंचा भरणा आहे. जॉनी बेअरस्टो आणि रिचर्ड ग्लीसन या नव्या खेळाडूंनीही उत्तम योगदान दिले. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग आणि प्रियंश आर्य या सलामीवीरांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.
गोलंदाजी ठरणार निर्णायक
नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत: अशा परिस्थितीत या सामन्यात गोलंदाजी महत्त्वाची ठरणार आहे. बुमराच्या अचूक माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा करणे कठीण जात आहे. मात्र, पंजाबने यंदाच्या हंगामात मुंबईला पराभूत केले आहे, हे विसरून चालणार नाही.
बुमरावर नजरा
अचूक टप्प्यावरील गोलंदाजीमुळे जसप्रित बुमराविरुद्ध धावा करणे सोपे नाही. मात्र पंजाबने या हंगामात मुंबईला पराभूत केले आहे. या सामन्यात बुमराने फारशा धावा दिल्या नसल्या तरी सहज पराभूत करण्यात पंजाबला यश आले होते.
१७ - १४
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एकूण ३२ सामने झाले आहेत. त्यातील १७ सामन्यांत मुंबईने बाजी मारली असून पंजाबला १४ सामन्यात विजय मिळवता आला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, 'कर्ण शर्मा, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन दले. श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन आणि बोश, रघु शर्मा.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल, मिचेल ओव्हन, कायले जेमिसन.
आयपीएलचे ४ सामने
मुंबई इंडियन्सने अहमदाबादमध्ये अद्याप एकही आयपीएल सामना जिंकलेला नाही. मुंबईने या मैदानात आयपीएलचे ४ सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप