
आयपीएलमध्ये गुरुवारी संध्याकाळी धरमशालाच्या मैदानावर सुरू असलेला पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अर्धवटच रद्द करण्यात आला.
धरमशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ही लढत खेळवण्यात येत होती. मात्र पंजाबने १०.१ षटकांत १ बाद १२२ धावा केलेल्या असताना स्टेडियममधील दोन लाइटचे टॉवर अचानक बंद झाले. एकच लाइटचे टॉवर सुरू राहिल्याने सुरुवातीला एकच गोंधळ उडाला. पाकिस्तानने ड्रोनद्वारे जम्मू आणि पंजाबमधील काही भागांत हल्ला केल्याचे समजले. त्यामुळे खबरदारी बाळगत हळूहळू सर्व लाइटचे टॉवर बंद करण्यात आले व सामना रद्द करण्यात आला. पोलिसांनीही त्वरितच चाहत्यांना स्टेडियम सोडून जाण्यास सांगितले.
बीसीसीआय स्टेडियममधील चाहत्यांना त्यांच्या इच्छुक स्थळी पोहचवण्यास विशेष वाहनांची सुविधा केली. तसेच खेळाडू, अन्य कर्मचारी यांना धरमशाला येथून अन्य शहरात नेण्यासाठी बीसीसीआय शुक्रवारी विशेष ट्रेनची व्यवस्था करणार आहे. शुक्रवारी आयपीएलची समिती व बीसीसीआयची बैठक होणार असून त्यानंतर आयपीएलचा निर्णय अपेक्षित आहे. आयपीएल स्थगित होण्याचीच शक्यता आहे.
मुंबई-पंजाब लढत आता धरमशाला ऐवजी अहमदाबादला
एकीकडे ८ मे रोजीचा दिल्ली-पंजाब यांच्यातील सामना अर्धवट स्थगित करण्यात आला आहे, तर दुसरीकडे ११ मे रोजी धरमशाला येथेच होणारा मुंबई-पंजाब यांच्यातील सामना आता अहमदाबादला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तूर्तास आयपीएल होईल की नाही, याबाबतच शंका आहे. मुंबईचे खेळाडू गुरुवारी अहमदाबाद येथे दाखल झाले. मात्र आयपीएल स्थगित झाल्यास पंजाबच्या संघाला येथे आणण्याची व्यवस्था रद्द केली जाईल. त्यामुळे आता केंद्र शासन व बीसीसीआय मिळून लवकरच निर्णय घेतील.
आयपीएल स्थगित होण्याची शक्यता
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता पाकिस्तानने पुन्हा केलेल्या हल्ल्यांमुळे आयपीएलचा सामना रद्द करावा लागला. तसेच आयपीएलचा उर्वरित हंगामही रद्द करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. शुक्रवारी याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे समजते. यापूर्वी २०२१मध्ये कोरोनामुळे आयपीएल मध्यातच स्थगित करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुबई येथे खेळवण्यात आली होती.