IPL 2025 : पावसाने केला हैदराबादचा घात; आता संघ उरले सात

आयपीएलचा १८वा हंगाम आता रंगतदार वळणावर आहे. सोमवारी दिल्ली-हैदराबाद यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली.
IPL 2025 : पावसाने केला हैदराबादचा घात; आता संघ उरले सात
Published on

मुंबई : आयपीएलचा १८वा हंगाम आता रंगतदार वळणावर आहे. सोमवारी दिल्ली-हैदराबाद यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे आता चेन्नई, राजस्थाननंतर हैदराबाद संघही स्पर्धेबाहेर गेला आहे. बाद फेरीच्या चार स्थानांसाठी पुढील दोन आठवडे उरलेल्या सात संघांत शर्यत पाहायला मिळणार आहे.

गतवर्षी उपविजेतेपद मिळवलेल्या हैदराबादचे ११ सामन्यांत फक्त ७ गुण आहेत. त्यामुळे उर्वरित तीन लढती जिंकूनही ते १३ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. गुणतालिकेत आताच चार संघ १४ गुणांवर आहेत. त्यामुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले. राजस्थान (६ गुण) व चेन्नई (४ गुण) आधीच स्पर्धेबाहेर गेले आहेत.

मुख्य म्हणजे आघाडीच्या चार संघांत दररोज बदल पाहायला मिळत आहे. मुंबई-गुजरात लढतीपूर्वी बंगळुरू १६ गुणांसह अग्रस्थानी आहे. पंजाबच्या खात्यात १५ गुण असून तेसुद्धा अव्वल चार संघांत टिकून आहेत. मुंबई-गुजरात यांचेही प्रत्येकी १४ गुण आहेत. मुंबईचा नेट रनरेट अन्य संघांच्या तुलनेत फार सर्वोत्तम आहे. त्यामुळे निर्णायक क्षणी मुंबईला याचा लाभ होऊ शकतो.

पाचव्या स्थानावरील दिल्लीची कामगिरी काहीशी ढासळलेली असली, तरी उरलेल्या ३ सामन्यांपैकी २ लढती जिंकून ते आगेकूच करू शकतात. सहाव्या क्रमांकावरील कोलकाता (११ गुण) व सातव्या क्रमांकावरील लखनऊ (१० गुण) यांच्यासाठी वाट बिकट आहे. मात्र आघाडीच्या चार संघांचे एखाद-दुसऱ्या लढतीत पराभव झाल्यास दिल्ली, लखनऊ, कोलकाता मुसंडी मारू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in