लखनऊसाठी 'करो या मरो'? आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पंजाबविरुद्ध आज जिंकणे गरजेचे
छायाचित्र सौ.- IPL Website

लखनऊसाठी 'करो या मरो'? आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पंजाबविरुद्ध आज जिंकणे गरजेचे

धरमशाला : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी लढती अखेरच्या टप्प्यात असून ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेशासाठी स्पर्धेतील रंगत आता वाढली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खराब फॉर्मचा सामना करत असून रविवारी त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. ही लढत त्यांच्यासाठी जवळपास ‘करो या मरो’ सारखीच आहे.
Published on

धरमशाला : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी लढती अखेरच्या टप्प्यात असून ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेशासाठी स्पर्धेतील रंगत आता वाढली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खराब फॉर्मचा सामना करत असून रविवारी त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. ही लढत त्यांच्यासाठी जवळपास ‘करो या मरो’ सारखीच आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ चांगली कामगिरी करत आहे. कर्णधार म्हणून श्रेयस आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडत आहे. फलंदाज म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.

अखेरच्या लढतीत पंजाबच्या कर्णधाराने हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले. शनिवारच्या लढतीपूर्वीपर्यंत पंजाबच्या संघाने १० सामन्यांमध्ये १३ गुण मिळवून गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे.

त्याउलट पंतच्या खराब फॉर्मचा फटका त्याच्या संघाला बसला असून पंजाबविरुद्धची लढत त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ सारखी आहे. लखनऊचा संघ १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.

श्रेयस अय्यरने गत हंगामात कोलकाता नाइट रायडर्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र तरीही त्याला कोलकाताने रिलीज केले. पंजाबने या खेळाडूसाठी २६.७५ करोड मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. अय्यरने यंदाच्या हंगामात आपल्या अप्रतिम नेतृत्वाने आतापर्यंत तरी प्रभाव पाडला आहे.

प्रियांश आर्य, नेहल वधेरा आणि शशांक सिंग अशी तगडी मधली फळी पंजाबकडे आहे. युझवेंद्र चहलचा फॉर्म परतल्याने पंजाबसाठी चांगले संकेत आहेत. चेन्नईविरुद्धच्या गत सामन्यात या फिरकीपटूने विकेटची हॅटट्रिक घेतली आहे.

फलंदाजीत सलामीवीर प्रभसिमरन सिंगने शानदार कामगिरी केली आहे. प्रभसिमरनने विक्रमी ११०० धावा जमवण्याची कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासात ११०० धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे.

पूरन (३७७ धावा), मार्श (३४४ धावा) आणि मार्करम (३२६ धावा) या तिकडीने लखनऊच्या संघासाठी उपयुक्त खेळी खेळली आहे. रविवारी त्यांच्या फलंदाजीकडे चाहत्यांच्या नजरा असतील. मयांक यादवचे पुनरागमन झाल्याने लखनऊच्या वेगवान गोलंदाजी विभागाला बळ मिळाले आहे. त्याने मुंबईविरुद्ध २ विकेट मिळवले आहेत. या कामगिरीने त्याचा आत्मविश्वास वाढला असेल. त्याचा फायदा पंजाबविरुद्धच्या लढतीत संघाला होऊ शकतो.

पंतच्या फॉर्मची चिंता

ऋषभ पंत धावा जमवण्यासाठी झगडतो आहे. गेल्या १० पैकी ६ सामन्यांत त्याने केवळ एक आकडी धावा केल्या असून एकूण ११० धावा त्याच्या खात्यात आहेत. हंगामात चेन्नईविरुद्ध त्याने ६३ धावांची त्याची सर्वाधिक खेळी आहे. पंतचा अनफॉर्म संघासाठी चिंतेची बाब आहे.

३-२

आयपीएलमध्ये लखनऊ आणि पंजाब हे संघ आतापर्यंत ५ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील ३ सामन्यांत लखनऊने बाजी मारली आहे, तर पंजाबने २ सामने जिंकले आहेत.

मॅक्सवेलचा बदली खेळाडू कोण?

हाताच्या दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याचा बदली खेळाडू शोधण्याचे आव्हान अय्यरसमोर असेल. अझमतुल्ला ओमरझाई, आरोन हार्डी किंवा झेव्हियर बार्टलेट यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. ही निवड परिस्थितीवर अवलंबून असेल.

प्रतिस्पर्धी संघ

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.

वेळ : सायंकाळी ७:३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in