
मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम आता निर्णायक टप्प्यावर आहे. गुरुवारपासून आयपीएलच्या बाद फेरीच्या (प्लेऑफ) लढतींना प्रारंभ होणार असून थरार आणखी वाढणार आहे. मुल्लानपूर (न्यू चंडीगड) येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी रंगणाऱ्या ‘क्लालिफायर-१’ सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी सर्वप्रथम कोण अंतिम फेरीचा मान मिळवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने यंदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत तब्बल ११ वर्षांनी बाद फेरी गाठली. मुंबईकर श्रेयसच्या कर्णधारपदाखाली पंजाबने गुणतालिकेत अग्रस्थान काबिज केले. तसेच मुल्लानपूर हे त्यांचे घरचे मैदान असल्याने पंजाबच्या खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच बळावला असेल. अखेरच्या साखळी लढतीत पंजाबने मुंबईवर वर्चस्व गाजवून आघाडीचे स्थान पक्के केले. आतापर्यंत फक्त एकदाच म्हणजे २०१४मध्ये पंजाबने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला पंजाबचा संघ यंदा दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
दुसरीकडे रजत पाटीदार सध्या जायबंदी असल्याने जितेश शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मुख्य म्हणजे मंगळवारीच त्यांनी अखेरच्या साखळी लढतीत लखनऊवर धडाकेबाज विजय मिळवताना २२८ धावांचे लक्ष्य १९ षटकांतच गाठले. त्यामुळे बंगळुरूने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावून क्वालिफायर-१मधील प्रवेश पक्का केला. २००९, २०११ व २०१६मध्ये बंगळुरूने अंतिम फेरी गाठलेली होती. मात्र तिन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा मात्र बंगळुरू चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासह पहिलेवहिले आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, यात शंका नाही. त्यामुळे दोन्ही संघांत रंगतदार लढत अपेक्षित आहे.
सलामीवीर आणि अर्शदीप पंजाबची ताकद
प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंग यांची सलामी जोडी पंजाबची मुख्य ताकद आहे. या दोघांपैकी एकानेही ज्या लढतीमध्ये ४५ धावांचा टप्पा गाठला आहे, तो सामना पंजाबने गमावलेला नाही. तसेच जोश इंग्लिसने मुंबईविरुद्ध मॅचविनिंग खेळी साकारून पंजाबची फलंदाजी आणखी बळकट केली. श्रेयस स्वत: उत्तम लयीत असून त्यानेच पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजीत डावखुरा अर्शदीप सिंग पंजाबची धुरा वाहील. मार्को यान्सेन आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी आफ्रिकेला माघारी परतल्याने कायले जेमिसन व विजयकुमार वैशाख यांना अर्शदीपला साथ द्यावी लागेल. फिरकीपटू युझवेंद्र चहल या लढतीसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. पंजाबच्या संघात सहा अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत.
हे नक्की वाचा!
मुल्लानपूर येथे यंदाच्या हंगामात झालेल्या चार सामन्यांपैकी ३ वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला. त्यापैकी २ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २००चा पल्ला गाठला, तर एकदा पंजाबने येथे १११ धावा करूनही कोलकाताला ९५ धावांत गुंडाळले. दवाचा येथे फारसा प्रभाव जाणवणार नाही.
विराट, जितेश फॉर्मात, हेझलवूडकडे लक्ष
बंगळुरूच्या फलंदाजीची भिस्त पुन्हा एकदा विराट कोहलीवर असेल. विराटने हंगामात ६०२ धावा केल्या आहेत. त्याशिवाय मयांक अगरवाल व जितेश शर्मा यांनी नुकताच लखनऊविरुद्ध भन्नाट खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला. रजत व लियाम लिव्हिंगस्टोन यांना मात्र कामगिरीत सुधारणा करावी लागेल. लिव्हिंगस्टोनच्या जागी टिम सेईफर्टला संधी मिळू शकते. कारण टिम डेव्हिड या लढतीसही दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत जोश हेझलवूड परतणार असल्याचे समजते. दुखापतीमुळे हेझलवूड काही सामन्यांना मुकला होता. भुवनेश्वर कुमार व यश दयाल यांची गोलंदाजी मात्र बंगळुरूसाठी चिंतेचा विषय आहे. तसेच फिरकीपटू सूयश शर्मालाही संघर्ष करावा लागला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड, मयांक अगरवाल, जोश हेझलवूड, ब्लेसिंग मुझरबानी, टिम सेईफर्ट.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल, मिचेल ओव्हन, कायले जेमिसन.
१८-१७
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३५ सामन्यांपैकी पंजाबने १८, तर बंगळुरूने १७ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीवरून दोन्ही संघांत कडवी झुंज असल्याचे स्पष्ट होते. या हंगामात उभय संघांत झालेल्या दोन साखळी सामन्यांपैकी एकदा पंजाबने, तर एकदा बंगळुरूने विजय मिळवला आहे.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप