
बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी रंगणाऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मार्गात अपराजित दिल्ली कॅपिटल्सचा अडथळा असेल. चिन्नास्वामी स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येणार असून या सामन्यात विजय मिळवण्यासह गुणतालिकेतील अग्रस्थानासाठी दोन्ही संघांत चुरस पाहायला मिळेल.
रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने यंदाच्या हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी करताना ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. मुख्य म्हणजे तिन्ही विजय प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात मिळवताना अनुक्रमे कोलकाता, चेन्नई व मुंबई यांना धूळ चारली. मात्र त्यांना गुजरातविरुद्ध घरच्या मैदानात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता चिन्नास्वामीवर पुन्हा खेळताना प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा लाभ उचलण्यासह खेळपट्टीनुसार कामगिरी उंचावण्याचे त्यांचे ध्येय असेल.
दुसरीकडे डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली यंदा दबंग कामगिरी करत आहे. सलग ३ विजयांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी असून त्यांना अद्याप कोणीही रोखू शकलेले नाहीत. दिल्लीने अनुक्रमे लखनऊ, हैदराबाद, चेन्नई या संघांना धूळ चारली आहे. त्यामुळे आता बंगळुरूला नमवून दिल्लीचा संघ विजयी चौकार लगावण्यास आतुर असेल. दिल्लीच्या संघात यापूर्वी बंगळुरूकडून खेळणाऱ्या काही खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे ते या अनुभवाचा लाभ उचलू शकतात.
दरम्यान, चिन्नास्वामीत १८० ते २०० धावांचा बचाव करणे कठीण गेले आहे. येथे दवही मोठ्या प्रमाणात येत असल्याने धावांचा पाठलाग होऊ शकतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो. एकूणच गुरुवारी चाहत्यांना कडवी झुंज अपेक्षित असून यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विराट, पाटीदार भन्नाट फॉर्मात
मुंबईविरुद्ध दमदार अर्धशतक झळकावणारी विराट कोहली आणि पाटीदार यांची जोडी भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याचे मुख्य आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांपुढे असेल. फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन व टिम डेव्हिड हे विदेशी फलंदाजांचे त्रिकुटही बंगळुरूच्या ताफ्यात आहे. मात्र त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. जितेश शर्मा आणि देवदत्त पडिक्कल यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावतील. गोलंदाजीत जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांची वेगवान जोडी बंगळुरूसाठी सातत्याने छाप पाडत आहे. फिरकी विभागात सूयश शर्मा व कृणाल पंड्या यांच्यावर बंगळुरूची भिस्त आहे. मात्र दोघांनाही चिन्नास्वामीवर धावा रोखण्यात अपयश आल्याचे दिसून आले. यश दयाल अखेरच्या षटकांत प्रभावी मारा करत आहे.
राहुल, स्टार्कवर दिल्लीची भिस्त
अनुभवी के. एल. राहुल उत्तम लयीत असून चेन्नईविरुद्ध त्याने सलामीला येत अर्धशतक झळकावले. मात्र आता फॅफ डूप्लेसिस या लढतीसाठी संघात परतल्याने राहुल पुन्हा मधल्या फळीत फलंदाजी करेल. जेक फ्रेसरकडून दिल्लीला अद्याप अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. त्यामुळे दिल्ली अन्य पर्याय पडताळून पाहू शकते. आशुतोष शर्मा व अक्षर यांच्यामुळे दिल्लीची फलंदाजी खोलवर लांबली आहे. गोलंदाजीत प्रामुख्याने डावखुरा मिचेल स्टार्क व मुकेश कुमार यांच्यावर दिल्लीची मदार आहे. फिरकी विभागात विपराज निगम, कुलदीप यादव व अक्षर यांचे फिरकी त्रिकुट दिल्लीसाठी कमाल करत आहे. त्यामुळे सांघिक कामगिरीच्या बळावर दिल्ली पुन्हा वरचढ ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
पाटीदारला १२ लाखांचा दंड
मुंबईविरुद्धच्या लढतीत निर्धारित वेळेत २० षटके पूर्ण न केल्यामुळे बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. हंगामात बंगळुरूकडून असे प्रथमच घडले. दुसऱ्या वेळेस कर्णधाराला २४ लाखांचा दंड आकारला जाईल, तर तिसऱ्या वेळेस सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातूनही कपात केली जाईल. मात्र यंदा कर्णधारावर बंदी घालण्याचा नियम काढण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या, लखनऊचा ऋषभ पंत व राजस्थानचा रियान पराग यांना षटकांच्या संथ गतीसाठी दंड ठोठावण्यात आला होता.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३१ सामन्यांपैकी बंगळुरूने १९, तर दिल्लीने ११ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. आकडेवारी बंगळुरूच्या बाजूने असली तरी दिल्ली यंदा पलटवार करण्यास सज्ज असेल.
विराटने या हंगामात आतापर्यंत ४ सामन्यांत १६४ धावा केल्या असून यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा विराटकडे सर्वांचे लक्ष असेल.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप