IPL 2025 : कोलकाताच्या फिरकीपटूंविरुद्ध बंगळुरूच्या फलंदाजांची कसोटी
कोलकाता : आयपीएलच्या सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सच्या फिरकीपटूंविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांची कसोटी लागू शकते. प्रामुख्याने विराट कोहली विरुद्ध वरुण चक्रवर्ती यांच्यातील जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष असेल. २००८मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामात याच संघांत सलामीची लढत रंगली होती. त्यानंतर आता थेट १८व्या पर्वात पुन्हा एकदा हे दोन संघ सलामीलाच आमनेसामने येतील.
गतवर्षी तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद मिळवणाऱ्या कोलकाताचे नेतृत्व यंदा मुंबईकर अजिंक्य रहाणे करत आहे. या संघात वरुणसह, सुनील नरिन, मोईन अली, मयांक मार्कंडे असे फिरकीपटू आहेत. तसेच फलंदाजीत रहाणेसह आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग यांच्यावर कोलकाताची भिस्त असेल. ईडन गार्डन्सवर दव मोठ्या प्रमाणात येत असल्याने येथे धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. फिरकीपटूंना येथे पोषक खेळपट्टी असली तरी दुसऱ्या डावातील नव्या चेंडूमुळे सामन्याचे समीकरण बिघडू शकते.
दुसरीकडे यंदा प्रथमच आयपीएलमध्ये बंगळुरूचे नेतृत्व करणारा पाटीदार कशी छाप पाडणार, हे पाहणे रंजक ठरेल. जर्सी क्रमांक १८ असलेल्या विराटसाठी १८वा हंगाम लकी ठरू शकतो. मात्र त्याला फलंदाजीत फिल सॉल्ट, टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन यांची साथ अपेक्षित आहे. गोलंदाजीत जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एन्गिडी व यश दयाल यांच्यावर बंगळुरूची मदार आहे. मात्र पावसाचा या लढतीवर प्रभाव राहील.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप