चिन्नास्वामीत रॉयल द्वंद्वाची पर्वणी! घरच्या मैदानात पहिल्या विजयाचे बंगळुरूचे ध्येय; आज राजस्थानशी गाठ

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चाहत्यांना गुरुवारी रॉयल द्वंद्वाची पर्वणी अनुभवता येणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चिन्नास्वामी स्टेडियमवर अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
चिन्नास्वामीत रॉयल द्वंद्वाची पर्वणी! घरच्या मैदानात पहिल्या विजयाचे बंगळुरूचे ध्येय; आज राजस्थानशी गाठ
छायाचित्र सौ. - FPJ
Published on

बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चाहत्यांना गुरुवारी रॉयल द्वंद्वाची पर्वणी अनुभवता येणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चिन्नास्वामी स्टेडियमवर अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सातत्याने संघर्ष करणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध ते घरच्या मैदानातील पराभवाची मालिका संपुष्टात आणतील, अशी अपेक्षा आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने ८ पैकी ५ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात १० गुण आहेत. मात्र बंगळुरूने पत्करलेले तिन्ही पराभव हे चिन्नास्वामी स्टेडियमवरील आहेत. मुख्य म्हणजे येथील तिन्ही सामन्यांत बंगळुरूने नाणेफेक गमावली असून प्रत्येक वेळेस प्रथम फलंदाजी केली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात दव येते. तसेच येथील सीमारेषेचे अंतरही जवळ असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतो.

दुसरीकडे संजू सॅमसन हाताच्या दुखापतीमुळे या लढतीला मुकणार असल्याने रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करणार आहे. गेल्या दोन लढतींमध्ये राजस्थानने हाताशी आलेला विजय गमावला. दोन्ही सामन्यांत त्यांना शेवटच्या ६ चेंडूंत ९ धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे सध्या राजस्थानचा संघ ८ सामन्यांतील फक्त २ विजयांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. बाद फेरी गाठण्यासाठी राजस्थानला सर्व सहा सामने जिंकणे गरजेचे आहे. तसेच त्यांना अन्य निकालांवरही अवलंबून रहावे लागेल.

दरम्यान, बंगळुरूला मात्र गुणतालिकेत अव्वल चार संघांतील स्थान पक्के करण्याची आणखी एक संधी आहे. त्यामुळे ते गुरुवारी राजस्थानवर यंदाच्या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवतील, अशी बंगळुरूच्या चाहत्यांना आशा आहे.

यशस्वीकडे लक्ष; ध्रुवला पुन्हा संधी?

१४ वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि मुंबईकर यशस्वी जैस्वाल या डावखुऱ्या सलामी जोडीकडून राजस्थानला अपेक्षा आहेत. त्याशिवाय गेल्या दोन लढतींमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या ध्रुव जुरेल व शिम्रॉन हेटमायरपैकी एकाला वगळण्याचा निर्णय राजस्थान घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल. सॅमसनच्या अनुपस्थितीत नितीश राणा व पराग यांना जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीसुद्धा राजस्थानसाठी चिंतेचा विषय आहे. जोफ्रा आर्चर लयीत असला तरी संदीप शर्मा डेथ ओव्हर्समध्ये सपाटून मार खात आहे. वानिंदू हसरंगा आणि महीष थिषणा या फिरकीपटूंना कामगिरी उंचवावी लागणार आहे.

सॉल्ट, डेव्हिड बंगळुरूचे तारणहार

बंगळुरूसाठी गेल्या काही सामन्यांत फिल सॉल्ट व सहाव्या स्थानी फलंदाजीस येणारा टिम डेव्हिड यांनी सातत्याने छाप पाडली आहे. त्याशिवाय विराट कोहली उत्तम लयीत आहेच. गेल्या सामन्यात विराट व देवदत्त पडिक्कल या दोघांनी अर्धशतके साकारली. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार व जोश हेझलवूड यांची वेगवान जोडी बंगळुरूची आधारस्तंभ आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, क्रुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.

राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

१६-१४

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३३ सामन्यांपैकी बंगळुरूने १६, तर राजस्थानने १४ लढतींमध्ये बाजी मारली आहे. ३ सामने रद्द करण्यात आले होते. आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये अटीतटीची झुंज असल्याचे सिद्ध होते. या हंगामातील पहिल्या लढतीत बंगळुरूने राजस्थानला ९ गडी राखून सहज नमवले होते.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in