
आयपीएल २०२५ चे १८ वे पर्व सुरू होण्याआधी राजस्थान रॉयल्स (RR) संघाला झटका बसलाय. राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये नियमित कर्णधार संजू सॅमसनऐवजी रियान पराग कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. संजू सॅमसन पहिल्या तीन सामन्यांमध्ये केवळ फलंदाज म्हणून खेळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. तर, रियान पराग कर्णधार असेल अशी घोषणा स्वतः संजूने खेळाडूंसमोर केली. तो व्हिडिओ देखील राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय आहे कारण?
संजू सॅमसनला इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेदरम्यान बोटाला दुखापत झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला अद्याप यष्टीरक्षणासाठी क्लीन चिट दिलेली नाही.
काय म्हणाला संजू?
"मी आधीच तुम्हाला कल्पना दिल्याप्रमाणे, पहिल्या तीन सामन्यांसाठी मी पूर्णपणे फिट नाहीये. या संघात अनेक लीडर्स आहेत, काही खेळाडू गेल्या काही वर्षांपासून उत्तम कामगिरी करतायेत. पण येत्या तीन सामन्यांसाठी रियान पराग कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. त्यासाठी तो पूर्ण सक्षम असून तुम्ही सर्व त्याला साथ द्याल अशी अपेक्षा आहे", असे म्हणत संजू सॅमसननेच खेळाडूंसमोर ही घोषणा केली. संजूने रियान परागचे नाव घेताच सर्व खेळाडूंनी टाळ्यांचा कडकडाट केला.
...तर ध्रूव जुरेलला संधी
संजूच्या अनुपस्थितीत ध्रूव जुरेल राजस्थानकडून यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे. जुरेलला फ्रँचायझीने १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. संघात दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज नाही. राजस्थानचा पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद संघाशी आहे.
२२ मार्चपासून आयपीएलचे १८वे पर्व सुरू होणार आहे. गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे.