IPL 2025 - RR vs GT : सिराज आणि गुजरातला रोखण्याचे राजस्थानपुढे आव्हान

आयपीएलमध्ये बुधवारी रंगणाऱ्या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसह गुजरात टायटन्सला रोखण्याचे आव्हान राजस्थान रॉयल्सपुढे असेल.
IPL 2025 - RR vs GT : सिराज आणि गुजरातला रोखण्याचे राजस्थानपुढे आव्हान
Published on

अहमदाबाद : आयपीएलमध्ये बुधवारी रंगणाऱ्या लढतीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसह गुजरात टायटन्सला रोखण्याचे आव्हान राजस्थान रॉयल्सपुढे असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी गुजरात व राजस्थान आमनेसामने येतील.

शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. पंजाबकडून सलामीची लढत गमावल्यावर गुजरातने मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यांना सहज धूळ चारली. विशेषत: बंगळुरू व हैदराबादविरुद्ध सिराजने सलग दोन वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यामुळेच कगिसो रबाडाच्या अनुपस्थितीतही गुजरातची गोलंदाजी बळकट वाटत आहे. आता घरच्या मैदानात खेळताना ते राजस्थानवर वर्चस्व गाजवण्यास उत्सुक असतील.

गिलसह जोस बटलर व साई सुदर्शन यांच्यावर गुजरातची फलंदाजी अवलंबून आहे. बटलर व सुदर्शन सातत्याने योगदान देत आहेत. तसेच शर्फेन रुदरफोर्डही फटकेबाजी करत आहे. शाहरूख खान व राहुल तेवतिया यांच्याकडून गुजरातला फटकेबाजी अपेक्षित आहे. गोलंदाजीत सिराजसह प्रसिध कृष्णा व इशांत शर्मा वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. फिरकी विभागात यंदा रशिद खानपेक्षा डावखुरा आर. साईकिशोर छाप पाडत आहे.

दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थाननेही योग्य वेळी लय पकडली आहे. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यावर राजस्थानने चेन्नई व पंजाब यांच्यावर विजय मिळवले. आता सलग तिसऱ्या विजयासाठी राजस्थानचा संघ आतुर असेल. तसेच २०२३मध्ये राजस्थानने गुजरातवर अहमदाबादमध्ये सरशी साधली होती. त्या कामगिरीद्वारे ते प्रेरणा घेऊ शकतात. येथे १८० ते २०० धावांचा पाठलाग यशस्वीरीत्या केला जाऊ शकतो.

सॅमसन, यशस्वी जैस्वाल व रियान पराग या भारतीय त्रिकुटावर राजस्थानची फलंदाजी विसंबून आहे. त्याशिवाय नितीश राणा, ध्रुव जुरेल व शिम्रॉन हेटमायरही त्यांच्याकडे आहेत. जोफ्रा आचर्रला गोलंदाजीत सूर गवसल्यामुळे राजस्थानची चिंता मिटली आहे. तसेच वानिंदू हसरंगा व महीष थिक्षणा या श्रीलंकन फिरकीपटूंची जोडी त्यांची ताकद आहे. संदीप शर्मा अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करत आहे. त्यामुळे चाहत्यांना दमदार लढत पाहायला मिळेल.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, ग्लेन फिलिप्स, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिम्रॉन हेटमायर, संदीप शर्मा, आकाश मढवाल, अशोक शर्मा, फझलहक फारुकी, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, क्वेना माफका, महीष थिक्षणा, नितीश राणा, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, युधविर चरक.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in